दोन वर्षांची मुलगी बेपत्ता
। पालघर । प्रतिनिधी ।
पालघर तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. हातपाय बांधलेल्या अवस्थेत डोंगरा लगतच्या नाल्यात एका महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. तर तिची दोन वर्षांची मुलगी बेपत्ता आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
पालघर तालुक्याच्या पूर्व भागातील दुर्गम भाग असलेल्या बर्डे पाड्यालगतच्या नाल्यात सोमवारी (दि. 02) दुपारी साडेतीनच्या सुमारास एक महिलेचा मृतदेह आढळला आहे. हातपाय बांधून दगडाला बांधलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने मृत्यूबाबत संशय व्यक्त केला जात आहे. सुस्मिता प्रवीण डावरे (28) असे मृत महिलेचे नाव आहे. तर तिची दोन वर्षांची मुलगी बेपत्ता आहे.
याबाबतची माहिती मिळताच मनोर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. तसेच, बेपत्ता झालेल्या दोन वर्षांच्या मुलीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.