। अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील साखर कोळीवाड्यातील 22 वर्षीय तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि.12) सायंकाळी जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान घडली आहे.
आदित्य दत्तात्रय सारंग असे या तरुणाचे नाव आहे. हा तरुण एका बोटीवर सुपरवायझरचे काम करीत असून, सोमवारी दुपारी घराच्या बाजूला असलेल्या विहिरीजवळ गेला. दरम्यान, पाणी काढण्याच्या मोटरच्या बसलेल्या विद्युत झटक्याने तो गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याला तातडीने अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरु होते. सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या तरुणाच्या मृत्यूने परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत असून, आक्षी ग्रामपंचायतीचे उपसरंपच आनंद बुरांडे यांच्यासह ग्रामस्थांनी रुग्णालयात धाव घेतली.
साखर कोळीवाडा येथील तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू
