| पनवेल | वार्ताहर |
बंद झालेले फोन पे ॲप पुन्हा सुरू करण्यासाठी गुगलवरून ग्राहक सेवेचा संपर्क क्रमांक शोधणे पनवेलमधील एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले आहे. या व्यक्तीला गुगलवरून ग्राहक सेवेचा जो मोबाइल नंबर मिळाला, त्यावरून बोलणाऱ्या भामट्याने फोन पे सुरू करून देण्याच्या बहाण्याने मोबाइलवर रस्टडेस्क ॲप डाऊनलोड करण्यास सांगून, त्याद्वारे त्याच्या बँक खात्यातून परस्पर 60 हजार रुपये काढून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पनवेल तालुका पोलिसांनी अज्ञात सायबर याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.
या प्रकरणातील तक्रारदार शाहिनाथ विघ्ने (40) हे पनवेल तालुक्यातील डेरवली गावात राहतात. फोन-पेच्या ग्राहक सेवा क्रमांकाच्या नावावर सायबर चोरट्यांनी फसवणूक करण्यासाठी गुगलवर ठेवलेल्या मोबाइल नंबरवर विघ्ने यांनी संपर्क साधला असता, समोरून बोलणाऱ्या भामट्याने फोन पे सुरू करून देण्याच्या बहाण्याने मोबाइलवर रस्टडेस्क हे ॲप डाउलोड करण्यास सांगितले. त्यानुसार विघ्ने यांनी ॲप डाउनलोड करताच भामट्याने त्यांच्या मोबाइलचा ताबा आपल्याकडे घेतला. सायबर चोरट्याने विघ्ने यांच्या मोबाइलवर आलेला ओटीपी टाकल्यास, फोन पे चालू होईल, असे सांगितले. त्यानुसार विघ्ने यांनी ओटीपी टाकताच त्यांच्या खात्यातून 60 हजार रुपये दुसऱ्या खात्यात वळवल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर विघ्ने यांनी नवी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पनवेल तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात सायबर चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पनवेलमधील इसमाची 60 हजारांनी फसवणूक
