दहा तासांतच पोयनाड पोलिसांकडून गुन्ह्याची उकल
। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील पळी येथील दोन ठिकाणी झालेल्या घरफोडीचा गुन्हा पोयनाड पोलिसांनी अवघ्या दहा तासांत उघडकीस आणला. कर्जबाजारी झालेल्या तरुणाने स्वतःच्या व काकाच्या घरात घुसून ही चोरी केल्याचे उघड झाले असून, त्याच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात यश आले.
पळी येथील पाटील कुटुंबियांतील दोन घरांमध्ये घुसून चोरट्याने 8 मे रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास चोरी केली. दोन्ही घरांतील लाखो रुपयांचा ऐवज चोरण्यात आला. भरदिवसा झालेल्या या चोरीचा गुन्हा पोयनाड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल केल्यावर पोलिसांनी शोध घेण्यास सुरुवात केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अंकुश सांगळे, पोलीस उपनिरीक्षक रवि गर्जे, पोलीस हवालदार कल्पेश नलावडे यांचे पथक तयार करण्यात आले.
ही चोरी घरातील कोणीतरी केल्याचा संशय पोलिसांना होता. चौकशी करीत असताना प्रतिकच्या बोलण्यामध्ये असमानता दिसून आली. अखेर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पोलिसी दणका मिळाल्यावर तो बोलता झाला. वडखळ येथील जेएसडब्ल्यू कंपनीत सुपरवायझर म्हणून काम करीत आहे. त्याने बँकेकडून व्याजाने पैसे काढले होते. पैसे परत करण्यास तो अपयशी ठरल्याने त्याने अन्य व्यक्तींकडून व्याजाने पैसे घेतले. कर्ज घेऊनदेखील त्याची परतफेड करणे कठीण होऊन बसले होते. अखेर त्याने स्वतःच्या घरातील लोखंडी कपाट फोडून चार लाख 56 हजार 358 रुपयांचे दागिने आणि काकांच्या घरातील पाच लाख 13 हजार 440 रुपयांचे दागिने असा एकूण नऊ लाख 12 हजार 716 रुपयांचा ऐवज लंपास केल्याचे कबूल केले.