| मुंबई | प्रतिनिधी |
सीवूड्स दारावे स्थानकात रेल्वे रूळ ओलांडताना लोकलच्या धडकेत एका 16 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि.21) दुपारच्या सुमारास घडली आहे. या अपघातामुळे अप आणि डाऊन हार्बर मार्गावरील लोकल सेवा काही काळ विस्कळित झाली होती. या मार्गावरील दोन्ही दिशेच्या गाड्या एकामागोमाग एक खोळंबल्याने प्रवाशांचे हाल झाले. हार्बर मार्गावर सोमवारी दुपारी 12 वाजून आठ मिनिटांनी पनवेलहून सीएसएमटीच्या दिशेने जाणारी लोकल सीवूड्स दारावे स्थानकात येत होती. याचदरम्यान एक 16 वर्षीय मुलगी रेल्वे रूळ ओलांडत असताना या लोकलची तिला धडक बसली. या धडकेमुळे गंभीर जखमी झालेल्या तरुणीला उपचारासाठी आरपीएफ पोलिसांनीजवळच्या रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याची माहिती सीवूड्स स्थानक प्रशासनाने दिली. या अपघातावेळी मुलीचे कुटुंब तिच्यासोबत प्रवास करत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.