इन्स्टाग्रामवरच्या मस्करीत गेला तरुणीचा जीव

। सातारा । वृत्तसंस्था ।

इन्स्टाग्रामवरच्या मस्करीत एका तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सातारा जिल्ह्यात घडली आहे. एका मैत्रिणीने इन्स्टाग्रामवर मुलाच्या नावाने फेक अकाउंट उघडून दुसऱ्या मैत्रिणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. मात्र भेटायची वेळ आली तेव्हा तरुणाने आत्महत्या केल्याचे सांगिताच तरुणीला धक्का बसला आणि तिने आत्महत्या केली.

एका तरुणीने मस्करी करण्यासाठी मनीष नावाने इन्स्टाग्रामवर फेक अकाउंट उघडले. त्यावरून आपल्या मैत्रिणीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. त्यानंतर फेक अकाउंटवर दोघीही बोलत होत्या. दरम्यान, दुसरी मैत्रिणीने फेक अकाउंटवरील मनीषला खरे समजून त्याच्या प्रेमात पडली. त्यानंतर तिने त्याला भेटण्याचा आग्रह केला असता त्या मैत्रिणीने आणखी एक शिवम पाटील नावाने अकाउंट काढले आणि त्यावरून आपण मनीषचे वडील असल्याचे सांगून मनिषचा मृत्यू झाल्याचे सांगितले. तसेच तिला दवाखान्यातले खोटे फोटोही पाठवले. हा धक्का प्रेमात पडलेल्या 24 वर्षीय तरुणीला सहन झाला नाही आणि तिने 12 जून रोजी गळफास घेत आत्महत्या केली.

सायबर पोलीस या प्रकरणी तपास करत होते. त्यानंतर इन्स्टाग्राम अकाउंटबाबत डिटेल्स समोर येताच सर्व प्रकार उघड झाला असून या प्रकरणी संशयित तरुणीला अटक केली आहे.

Exit mobile version