आरोग्य शिबीरातून रुग्णांना आधार

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा स्तुत्य उपक्रम

| अलिबाग | प्रतिनिधी |

अलिबाग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत विशेषज्ञ आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले. माणगाव तालुक्यातील लोणारे येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठात गुरुवारी (दि.5) जानेवारी रोजी झालेल्या या शिबीराला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. वेगवेगळ्या आजारांची तपासणी यावेळी करण्यात आली. त्यामुळे या शिबीरातून रुग्णांना आधार मिळाला आहे.

नागरिकांना दर्जेदार वैद्यकीय सेवा प्रदान करणे, महाराष्ट्र शासनाच्या सहा आरोग्य अभियानाविषयी जनजागृती निर्माण करणे हे मुळ उद्दीष्ट होते. या शिबीरात अलिबाग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विशेषज्ञ डॉक्टर पथक सहभागी झाले होते. एकूण 187 रुग्णांचे निदान व उपचार या शिबिरामध्ये करण्यात आले. त्यात 21 रुग्णांना मधुमेह व 26 रुग्णांना उच्च रक्तदाब झाल्याचे आढळून आले. या रुग्णांची संपुर्ण तपासणी करून त्यांच्यावर औषध उपचार करण्यात आले.मिशन अवयव दान अंतर्गत लोकांना समुपदेशन करून अवयव दान करण्यास प्रवृत्त करण्यात आले. यावेळी सहा जणांनी अवयव दान करण्यासाठी अर्ज दाखल केले. रुग्णांना चांगली सेवा देण्याच्या उद्देशाने राबविलेल्या या उपक्रमात वेगवेगळ्या अधिकाऱ्यांनी भेट दिली. त्यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांचे त्यांच्याकडून कौतूक करण्यात आले.

Exit mobile version