पोलिसांनी व रेस्क्यू टीम घटनास्थळी रवाना
| माणगाव | वार्ताहर |
माणगाव तालुक्यातील चांदोरे गावच्या हद्दीत एका ओढ्यामध्ये बेवारस स्थितीत पडलेली एक पांढर्या रंगाची कार पोलिसांनी व साळुंखे रेस्क्यू टीम माणगाव यांनी क्रेनच्या सहाय्याने ओढ्याबाहेर काढली. बेवारस स्थितीत ओढ्यामध्ये सापडलेल्या या कारबद्दल विभागात नागरिकांच्या विविध चर्चा रंगल्या होत्या. ही गाडी कोणीतरी ओढ्यामध्ये ढकलून दिली असावी, असा अंदाज पोलीस व नागरिकांतून व्यक्त केला जात आहे.
तालुक्यातील चांदोरे गावच्या हद्दीतील ओढ्यामध्ये एक पांढर्या रंगाची कार (क्र.एमएच14 डीएफ 4167) पडली असल्याची माहिती चांदोरे गावचे सुजित शिंदे यांनी मंगळवार, दि.16 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता दूरध्वनीवरून पोलिसांना दिली.त्यानंतर या घटनेची माहिती मिळाल्यावर माणगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण पाटील, माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मोहिते, सहाय्यक फौजदार कुवेसकर, पोलीस हवालदार पोकळे, पोलीस नाईक जाधव, पोलीस शिपाई डोईफोडे यांच्या पथकाने घटनास्थळी तातडीने जाऊन पाहणी केली. त्यावेळी त्यांना ही कार ओढ्यामध्ये अर्धवट बुडालेल्या अवस्थेत दिसली. ही गाडी साळुंखे रेस्क्यू टीम माणगाव यांच्या मदतीने व क्रेनच्या सहाय्याने पाण्याबाहेर काढण्यात आली. ही गाडी माणगाव पोलीस ठाणे येथे आणण्यात आली असून, गाडीची अधिक चौकशी माणगाव पोलीस करीत आहेत.