बेवारस वाहनांचे रस्त्यांवर ठाण

शहराच्या सौंदर्यांत बाधा, नागरिकांकडून कारवाईची मागणी
| पनवेल । वार्ताहर ।
वाहतुकीस अडथळा निर्माण करणार्‍या बेवारस स्थितीतील वाहनांवर वाहतूक पोलीस व पालिका प्रशासनाकडून कारवाई केली जात आहे. मात्र, ही कारवाई काही रस्त्यांवरच होत असल्याने शहरातील विविध मार्गावर आजही बेवारस, धूळ खात पडलेली भंगारातील वाहने उभी आहेत. त्यामुळे अशा बेवारस वाहनांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

पनवेल महापालिका क्षेत्रात नागरिकांना प्रवास करणे सुलभ जावे, या दृष्टिकोनातून रस्त्यालगत उभी केलेली, शहराच्या सौंदर्यांत बाधा आणणारी बेवारस आणि भंगार स्थितीतील वाहने उचलण्याची मोहीम अतिक्रमणविरोधी पथक आणि वाहतूक पोलिस यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात येणार होती. तशा प्रकारच्या नोटिसाही वाहनांवर लावण्यात आल्या होत्या. मात्र, काही कारणास्तव ही मोहीम बारगळली. त्यामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर आजही वाहतुकीला अडथळा ठरणारी बेवारस वाहने उभी आहेत. या वाहनांमुळे वसाहतींमधील अनेक रस्ते अरुंद झाली असून मोठ्या वाहनाला एखाद्या भागातून जाताना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे अन्यथा वेळ व इंधनाचा होणार्‍या अपव्ययामुळे महापालिकेकडून अशा बेवारस वाहनांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

गुन्हेगारी घटनांसाठी वापराची शक्यता
पनवेल स्टेशन परिसरातील रस्ते, उद्यान, मैदाने याच्या आजूबाजूला असलेला रस्ता तसेच पदपथांवर ही वाहने बिनधास्तपणे उभी केली जात आहेत. यातील अनेक गाड्या या महिनोमहिने एकाच ठाण मांडून असून याविषयी कोणालाच माहिती नाही. तर अनेक वाहनांच्या नंबर प्लेट या परराज्यातील, शहरातील असल्याने गुन्हेगारी घटनांसाठी अशा वाहनांचा वापर होण्याचा धोका वर्तवला जात आहे.

पालिका परिसरात अनेक दिवसांपासून बेवारस स्थितीत असलेली वाहने हटवण्यासाठी एजन्सी नेमली आहे. लवकरच वाहतूक विभाग व पालिके मार्फत या वाहनांवर नोटिसा लावल्या जातील. तसेच दिलेल्या कालावधीत प्रतिसाद आला नाहीतर वाहनांवर कारवाई केली जाईल. – कैलास गावडे, उप-आयुक्त, पनवेल महापालिका

Exit mobile version