जिल्ह्यातील 21 दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणार फिरते दुकान
| खास प्रतिनिधी | रायगड |
जिल्हा परिषदेमार्फत दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी फिरत्या वाहनावरील दुकान ही योजना हाती घेण्यात आली आहे. दिव्यांग व्यक्तींना रोजगार प्राप्त होऊन ते स्वावलंबी व्हावेत, या उद्देशाने त्यांना पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (ई-टेम्पो, मोबाईल शॉप ऑन व्हेईकल) मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
जिल्हा परिषदेच्या फिरत्या वाहनावरील दुकान योजनेला दिव्यांग बांधवांचा उत्तम प्रतिसाद मिळाला असून, 160 दिव्यांग बांधवांनी योजनेचा लाभ मिळावा यासाठी अर्ज केले होते. यापैकी 21 दिव्यांग बांधवांना योजनेचा लाभ मिळणार असून, गुरुवारी (दि.29) जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांच्या उपस्थितीत लाभार्थ्यांची नावे निश्चित करण्यासाठी सोडत काढण्यात आली. शासकीय मूकबधीर विद्यालयातील इयत्ता दुसरीमधील विद्यार्थी आदर्श बुधे या मुलाच्या हस्ते सोडतीच्या चिठ्ठ्या उचलण्यात आल्या.
रायगड जिल्हा परिषद ही दिव्यांग व्यक्तींच्या कल्याणासाठी सातत्याने विविध योजना, उपक्रम राबवित असते. याचाच एक भाग म्हणून दिव्यांग व्यक्तींसाठी फिरत्या वाहनावरील दुकान ही योजना हाती घेण्यात आली आहे. ही योजना जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येत असून, यासाठी जिल्हा परिषदेच्या 2024/25 या वित्तीय वर्षाच्या अर्थसंकल्पात 1 कोटी 8 लाख 80 हजार रुपयांची तरतूद करण्यात आली होती. योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाने केले होते.
जिल्हा परिषदेच्या फिरत्या वाहनावरील दुकान योजनेला दिव्यांग बांधवांचा उत्तम प्रतिसाद मिळाला असून, 160 दिव्यांग बांधवांनी योजनेचा लाभ मिळावा यासाठी अर्ज केले होते. या योजनेसाठी प्रत्येक तालुक्यात दोन लाभार्थी निवडण्याचा कोटा निश्चित करण्यात आला होता. जिल्ह्यातील अलिबाग, पेण, उरण, पनवेल, कर्जत, रोहा, माणगाव, श्रीवर्धन, महाड या तालुक्यांमध्ये दोनहून अधिक अर्ज आल्याने या प्रत्येक तालुक्यातील दोन लाभार्थ्यांची निवड सोडतीच्या माध्यमातून करण्यात आली. तर मुरुड, सुधागड, पोलादपूर या तालुक्यातून योजनेचा लाभ मिळावा यासाठी एकच अर्ज आल्याने या लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे.
खालापूर, तळा, म्हसळा तालुक्यातून योजनेचा लाभ मिळावा यासाठी एकही लाभार्थ्यांनी अर्ज केला नव्हता, यामुळे या तालुक्यातील प्रत्येकी दोन लाभार्थ्यांचा कोटा शिल्लक ठेवण्यात आला आहे. तसेच मुरुड, सुधागड, पोलादपूर या तालुक्यातील प्रत्येकी एक लाभार्थी कोटा शिल्लक असून, या नऊ लाभार्थी निवडण्यासाठी संबंधित तालुक्यातून पुन्हा अर्ज मागविण्यात येणार आहेत.
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, मुख्य वित्त व लेखा अधिकारी राहुल कदम, जिल्हा समाजकल्याण अधिकारी डॉ. शामराव कदम, साईनाथ पवार यांच्यासह समाजकल्याण विभागातील अधिकारी, कर्मचारी, पत्रकार उपस्थित होते.
पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (ई-टेम्पो, मोबाईल शॉप ऑन व्हेईकल) सुमारे 3 लाख 50 हजार रुपये किमतीचे आहे. सदर ई-टेम्पो लाभार्थ्यांना 100 टक्के अनुदानावर देण्यात येणार आहे. वाहनातील अंतर्गत भागात व्यवसायाच्या दृष्टीने डिजाइन करण्यात येणार आहे. फिरत्या वाहनावरील दुकानामुळे दिव्यांगांना रोजगार प्राप्त होणार आहे.