| खास प्रतिनिधी | रायगड |
अलिबागमधील नामांकीत शाळेत दहावी इयत्तेत शिकणार्या विद्यार्थिनीच्या दप्तरात अज्ञाताने अश्लील भाषेत चिठ्ठी लिहून ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तर, दुसरीकडे चोंढी येथील शाळेत शिकणार्या मुलीला रस्त्यात अडवून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला. या घटनेनंतर पालकांमधून संताप व्यक्त होत आहे.
अलिबाग येथील एका इंग्रजी माध्यमात शिकणारी विद्यार्थिनी वर्गाबाहेर गेली होती. यावेळी तिच्या दप्तरामध्ये कोणीतरी अश्लील भाषेत चिठ्ठी लिहून ठेवली. चिठ्ठीवर मुलाचे नावही लिहिण्यात आले होते. याबाबत सदर विद्यार्थिनीने तक्रार दिल्यानंतर अलिबाग पोलीस ठाण्यात वियनभंगासह पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे चोंढी येथील शाळेतील अल्पवयीन मुलीसोबत वियनभंगाचा प्रसंग घडला. सदर मुलगी घरी जात असताना, एका मुलाने तिचा पाठलाग करत तिच्याशी बोलण्याचा, जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. तसेच त्या मुलीला आणि तिच्या मैत्रिणीला अश्लील शिवीगाळ करत, हात लावत तिचा विनयभंगही केला.
या दोन्ही घटना अनुक्रमे 26 आणि 28 ऑगस्ट रोजी घडल्या आहेत. याबाबत दोन्ही मुलींनी अलिबाग व मांडवा सागरी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी सदर मुलांविरोधात वियनभंगासह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. या घटनांचा अधिक तपास मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक भोई व अलिबाग पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शरद शिंपने करत आहेत.