मनसे तालुकाध्यक्षपदी अभिनव भुरण

। चिपळूण । प्रतिनिधी ।
गेल्या काही वर्षांनंतर चिपळूण मनसेत फेरबदल झाले असून तालुकाध्यक्षपदी खेर्डी येथील अभिनव भुरण यांची तर शहराध्यक्षपदी प्रशांत सावर्डेकर यांची निवड झाली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. या निवडीनंतर मावळते तालुकाध्यक्ष संतोष नलावडे यांनी या निवडीचे स्वागत केले असून नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांना आपले नेहमीच सहकार्य राहील, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
े याबाबत तालुकाध्यक्ष अभिनव भुरण यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, आपण मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे व्यक्तीमत्त्व व कार्यप्रणालीवर प्रेरित होऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये कार्यरत झालो. यानंतर आपण सामाजिक प्रश्‍न हाताळले आणि ते मार्गी देखील लावले. निस्वार्थी वृत्तीने पक्षाशी बांधील राहून केलेल्या कार्याची दखल घेत मनसे प्रमुख पक्षप्रमुख राज ठाकरे व उपाध्यक्ष सतीश नारकर यांनी आपल्यावर तालुकाध्यक्ष पदाची दिलेली जबाबदारी मनोबल वाढवणारी आहे. भविष्यात पक्षवाढीसाठी तसेच जनतेच्या हिताशी कटिबद्ध राहून मिळालेल्या संधीचे सोनं करण्याचा नक्कीच प्रयत्न राहील, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
या बदलाबाबत मनसे रत्नागिरी जिल्हा संपर्क अध्यक्ष सतीश नारकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, संतोष नलावडे हे जुने निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात फेरबदल करताना चिपळूण तालुक्यात देखील फेरबदल केले गेले असले तरी मावळते तालुकाध्यक्ष संतोष नलावडे यांच्यावर लवकरच नवीन जबाबदारी दिली जाईल, अशी माहिती यावेळी दिली.

Exit mobile version