श्री साई क्लब, जय दत्तगुरु,शताब्दी आकांक्षाची विजयी सलामी
| मुंबई | प्रतिनिधी |
श्री साई क्लब, जय दत्तगुरु, शताब्दी स्पोर्ट्स, आकांक्षा यांनी अभिनव स्पोर्ट्स क्लबने आयोजित केलेल्या कुमार गट कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी दिली. माटुंगा(पूर्व) येथील नप्पू लखमशी मनोरंजन मैदानावर आजपासून सुरू झालेल्या उदघाटनिय सामन्यात श्री साई क्लबने चुरशीच्या सामन्यात यंग विजयला 32-30 असे चकवीत आगेकूच केली. मध्यांतराला 13-16 अशा 3गुणांनी पिछाडीवर पडलेल्या श्री साईने नंतर मात्र जोरदार आक्रमण करीत विजय खेचून आणला. प्रज्वल पाटील, समीर शेख यांच्या चढाई-पकडीच्या भन्नाट खेळाला या विजयाचे श्रेय जाते. यश बेळणेकर, अथर्व गुरव यांचा पूर्वार्धातील जोश उत्तरार्धात कमी पडला.
जय दत्तगुरुने श्रीराम क्रीडा विश्वस्तचा 40-28 असा सहज पाडाव केला. विश्रांतीला 23-10 अशी आघाडी घेणार्या जय दत्तगुरुने नंतर सावध खेळ करीत विजय साकारला. ओमकार पाटील, साईल सारंग जय दत्तगुरु कडून, तर पवन पाठक, देव शर्मा श्रीराम कडून उत्कृष्ट खेळले. इतर दोन्ही सामने अगदीच एकतर्फी झाले. त्यात शताब्दीने शिवनेरीला 29-12, तर आकांक्षाने डॉ. आंबेडकरचा 33-16 असा पराभव करीत आगेकूच केली.तृतीय श्रेणी संक्षिप्त निकाल :- 1)संघर्ष मंडळ वि.वि. शिवतांडव(37-20); 2)गुरू माऊली स्पोर्ट्स वि.वि. श्री हनुमान सेवा (45-13); 3)शिवनेरी स्पोर्ट्स वि.वि. रणझुंजार (29-14).