प्रा. गवाणकर शाळेस उपविजेतेपद
| कर्जत | प्रतिनिधी |
रायगड जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे तालुकास्तरीय विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहेत. कर्जत तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा नुकतीच संपन्न झाली. यामध्ये कर्जत तालुका व्हॉलीबॉल स्पर्धेत अभिनव शाळा विजयी, तर प्रा. गवाणकर शाळेस उपविजेतेपद मिळाले आहे.
रायगड जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे तालुकास्तरीय विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. कर्जत तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा नुकतीच गुंडगे येथील गुड शेफर्ड शाळेत आयोजित केल्या होत्या. 17 वर्षीय वयोगटात कर्जतच्या अभिनव शाळेच्या विद्यार्थ्यांनी माथेरानच्या प्रा. शांताराम गवाणकर शाळेचा अटीतटीच्या सामन्यात पराभव करीत विजय नोंदवला. प्रा. गवाणकर शाळेच्या संघाने प्रथम तालुकास्तरीय स्पर्धेत भाग घेतला होता. स्वराज काळे, टेनिस बर्गे, निखिल केलगणे व अक्षय आखाडे या खेळाडूंनी आक्रमक खेळ करत गवाणकर संघाला अंतिम सामन्यात पोहोचवले. गवाणकर शाळेचे ट्रस्टी शशिभूषण गवाणकर यांनी खेळाडूंचे कौतुक केले व इतर स्पर्धांमध्येदेखील असाच खेळ करण्यासाठी प्रोत्साहित केले. संघपाल वाठोरे यांनी व्यवस्थापक म्हणून काम पाहिले, तर निवृत्त क्रीडा शिक्षक सुनील शिंदे यांनी व्हॉलीबॉलचे प्रशिक्षण दिले.
गुड शेफर्ड शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर आमला यांनी उत्तम आयोजन केले होते, तर स्पर्धेसाठी पंच म्हणून पंच स्वप्निल नामदास, श्रीकांत चव्हाण, निशांत तिजोरे, गुणलेखाक सुंदरलाल राठोड, सुनील कोळी, जाधव सर, शिवानंद सर, स्पर्धेचे नियोजन किशोर पाटील व संदेश देशपांडे यांनी केले. अभिनव शाळेचा संघ जिल्हास्तरीय स्पर्धेत कर्जत तालुक्याचे प्रतिनिधित्व करेल.