राजीवी गांधी मैदानावर ‌‘अभिषेक’

सनरायझर्स हैदराबादचा विजयी चौकार; गुणतालिकेत पहिल्या चारमध्ये स्थान

| हैद्राबाद | वृत्तसंस्था |

इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेचा आता पहिला टप्पा संपत आला असून आता संघांमध्ये पहिल्या चारमध्ये स्थान मिळवण्यासाठी चुरस दिसून येत आहे. नुकतेच सनरायझर्स हैदराबादने राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर मंगळवारी (दि.21) दिल्ली कॅपिटल्सला 47 धावांनी पराभूत करत मोठी झेप घेतली आहे. अडखळत सुरुवात झालेल्या हैदराबादने आता चांगली लय पकडली आहे. त्यामुळे त्यांनी आता गुणतालिकेतही पहिल्या चारमध्ये स्थान मिळवण्यात यश मिळवले आहे. हा सामना अभिषेक शर्माने शतक करत गाजवला. त्यामुळे त्याने देखील आता ऑरेंज कॅपच्या शर्यतीत गरुडझेप घेतली आहे.

या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून सनरायझर्स हैदराबादला प्रथम फलंदाजीसाठी बोलावले. मात्र, सलामीला आलेल्या अभिषेक शर्माने सुरुवातीपासून शेवटपर्यंत फटकेबाजी केली. त्याने ट्रॅव्हिस हेड (37), इशान किशन (25) आणि हेनरिक क्लासेन (नाबाद 37) यांच्यासोबत भागीदाऱ्या करत आयपीएलमधील दुसरे, तर टी-20 कारकिर्दीतील 9वे शतक पूर्ण केले. त्याने 68 चेंडूत 10 चौकार आणि 10 षटकारांसह नाबाद 135 धावा केल्या. त्यामुळे हैदराबादने 20 षटकांत 2 बाद 242 धावा केल्या. त्यानंतर 243 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीसाठी पाथुम निसंका आणि केएल राहुल यांनी डावाची सुरुवात केली. परंतु, तिसऱ्या षटकात निसंकाला दिलशान मदुशंकाने 8 धावांवर बाद केले. मात्र, त्यानंतर केएल राहुलसह नितीश राणाने चांगली फलंदाजी केली. या दोघांमध्ये 86 धावांची भागीदारीही झाली. परंतु, 10व्या षटकात केएल राहुलचा अडथळा साकिब हुसैनने दूर केला. त्याने केएल राहुलला 37 धावांवर झेलबाद केले. त्याच्यापुढचे इशान मलिंगाने टाकलेले 11वे षटक दिल्लीला सर्वात मोठा धक्का देणारे ठरले. या षटकात पहिल्याच चेंडूवर त्याने नितीश राणाला 57 धावांवर झेलबाद केले. त्याच्या पुढच्याच चेंडूवर इशानने डेव्हिड मिलरला शून्यावर त्रिफळाचीत केले. त्यानंतर ट्रिस्टन स्टब्स आणि समीर रिझवी यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यात 59 धावांची भागीदारी झाली. परंतु, ही भागीदारीही 16व्या षटकात मलिंगानेच तोडली. त्याने स्टब्सला 27 धावांवर बाद केले. 18व्या षटकात आशुतोष शर्मालाही 14 धावांवर मलिंगानेच बाद केले. त्यानंतर 20व्या षटकात हर्ष दुबेने अक्षर पेटल (2), समीर रिझवी (41) आणि लुंगी एनगिडी (0) यांना बाद केले. हैदराबादकडून इशान मलिंगाने सर्वाधिक 4 बळी घेतले. तर, हर्ष दुबेने 3 बळी घेतले. तसेच, दिलशान मदुशंका आणि साकिब हुसैन यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.

अभिषेक शर्माची ‌‘ऑरेंज' झेप
या सामन्यापूर्वी अभिषेकच्या आयपीएल 2026 स्पर्धेत 6 सामन्यात 2 अर्धशतकांसह 188 धावा होत्या. तो आयपीएल 2026 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये 17 व्या क्रमांकावर होता. मात्र, दिल्लीविरुद्ध केलेल्या नाबाद 135 धावांच्या खेळीमुळे त्याने थेट अव्वल क्रमांकावर उडी घेतली आहे. त्याचे आता 7 सामन्यांत 53.83 सरासरीने 323 धावा झाल्या आहेत. त्यामुळे आता त्याच्याकडे सध्या ऑरेंज कॅप आहे. त्याने त्याचा संघसहकारी हेनरिक क्लासेनला मागे टाकले आहे. आयपीएल 2026 स्पर्धेत आत्तापर्यंत केवळ अभिषेक शर्मा आणि हेनरिक क्लासेन यांनीच 300 धावांचा टप्पा ओलांडला आहे. क्लासेन या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 7 सामन्यांत 320 धावा केल्य आहेत. या दोघांच्या पाठोपाठ तिसऱ्या क्रमांकावर शुभमन गिल असून त्याने 5 सामन्यांत 265 धावा केल्या आहेत.
Exit mobile version