प्ले ऑफच्या शर्यतीत मोठी उलथापालथ; कूपर कॉनलीचे शतक
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
220+ धावा उभारल्यानंतर विजय पक्का, हे समीकरण सनरायझर्स हैदराबादने कायम राखले. इंडियन प्रीमियर लीग 2026 मध्ये पंजाब किंग्सचा पराभव करून सनरायझर्सने गुणतालिकेत 14 गुणांसह अव्वल स्थान पटकावले. पंजाबची मक्तेदारी मंगळवारी संपुष्टात आली आणि आता प्ले ऑफची शर्यत अधिक रंगतदार झाली आहे. हैदराबादने आज तिन्ही आघाड्यांवर वर्चस्व गाजवले, तेच पंजाबला 3 झेल सोडणे महागात पडले. आता प्ले ऑफची शर्यत आणखी चुरशीची झाली आहे. कूपर कॉनलीने खणखणीत शतक झळकावले, पंरतु पंजाबला विजय मिळवून देण्यासाठी त्याची एकट्याची झुंज कामी नाही आली.
पंजाबच्या गचाळ क्षेत्ररक्षणाचा फायदा हैदराबादच्या फलंदाजांनी पुरेपूर उचलला. तीन सोपे झेल व एक स्टम्पिंग गमावल्याचा पंजाबला संपूर्ण सामन्यात पश्चाताप झाला. अभिषेक शर्माने 13 चेंडूंत 2 चौकार व 4 षटकारांसह 35 धावांची आक्रमक खेळी केली आणि त्याला ट्रॅव्हिस हेड ( 19 चेंडूंत 38 धावा) याची साथ मिळाली. दोन्ही सलामीवीर माघारी परतल्यानंतर पंजाबला डोकं वर काढण्याची संधी होती, परंतु शशांक सिंग, कूपर कॉनली व ल्युकी फर्ग्युसन यांनी सोपे झेल टाकले. मिळालेल्या संधीचं सोनं करताना इशानने 32 चेंडूंत 2 चौकार व 4 षटकारांसह 55 धावा केल्या. इशान व हेनरिच क्लासन यांनी 48 चेंडूंत 88 धावांची भागीदारी केली.
क्लासनने मोर्चा सांभाळताना 43 चेंडूंत 3 चौकार व 4 षटकारांसह 69 धावा केल्या, त्याच्यासोबत नितीश कुमार रेड्डीने 32 चेंडूंत 63 धावा जोडल्या. नितीश 13 चेंडूंत 2 चौकार व 2 षटकारांसह 29 धावांवर नाबाद राहिला आणि हैदराबाद 4 बाद 235 धावांपर्यंत पोहोचला. पंजाबने या पर्वात पाच सामने लक्ष्याचा पाठलाग करताना जिंकले असले तरी हैदराबादने 10 वेळा 220 हून अधिक धावा केल्या आणि त्यांना एकही हार पत्करावी लागली नाही. आजच्या डावात हैद्राबानने मारलेले 17 षटकार ही देखील विरुद्ध त्यांची सर्वाधिक संख्या आहे.
पंजाबची सुरुवात काही खास झाली नाही आणि प्रियांश आर्य (1) व प्रभसिमरन सिंग (3) हे दोन्ही सलामीवीर अनुक्रमे इशान मलिंगा व पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर बाद झाले. हैदराबादच्या क्षेत्ररक्षकांनी सुरेख झेल टिपले. श्रेयस अय्यरही (5) स्वस्तात माघारी परतल्यानं पंजाबची अवस्था 3 बाद 23 अशी झालेली. मार्कस स्टॉयनिस व कूपर कॉनली यांनी 40 धावांची भागीदारी करून पंजाबचा डाव सावरला होता. पण, शिवांग कुमारने ही जोडी तोडली. स्टॉयनिस 14 चेंडूंत 28 धावांवर बाद झाला. पंजाबला 10 षटकांत 4 बाद 91 धावा करता आल्या होत्या आणि त्यांना 60 चेंडूंत 145 धावा करायच्या होत्या.
सूर्याश शेडगेला (25) आज मोठी खेळी करून मैदान गाजवण्याची संधी होती, परंतु पॅट कमिन्सच्या अनुभवासमोर तो अपयशी ठरला. आखुड चेंडूवर पुल शॉट मारण्याच्या प्रयत्नात तो झेलबाद झाला. पंजाबचे विकेटसत्र कायम राहिले आणि शशांक सिंग (4) अपयशी ठरला. कूपर कॉनली एकटा खिंड लढवताना दिसला आणि त्याने अर्धशतकही पूर्ण केले, परंतु पंजाबच्या विजयासाठी त्याची झुंज पुरेशी नव्हती. हैदराबादने 33 धावांनी विजय मिळवताना पंजाबला 7 बाद 202 धावांवर रोखले. कॉनली 59 चेंडूंत 7 चौकार व 8 षटकारांसह 107 धावांवर नाबाद राहिला.
सनरायझर्स हैदराबाद गुणतालिकेत 14 गुणांसह अव्वल स्थानी आला आहे आणि पंजाब 13 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. पंजाबची गाडी घसरत चालली आहे आणि हा त्यांचा सलग तिसरा पराभव आहे. त्यामुळे त्यांचा असाच खेळ शिल्लक राहिला, तर अन्य संघांना संधी मिळू शकते. आरसीबी व राजस्थान रॉयल हे संघ प्रत्येकी 12 गुणांसह अव्वल चारमध्ये आहेत. गुजरात टायटन्स ( 12) व चेन्नई सुपर किंग्स (10) हेही अजून शर्यतीत आहेत. त्यामुळे अव्वल चारमधील संघांची चुक इतरांसाठी निर्णायक ठरू शकते.







