। मुंबई । वृत्तसंस्था ।
आयपीएल 2024 मधील 18 व्या सामन्यात हैदराबादने गतविजेत्या चेन्नईचा एकतर्फी 6 गडी राखून पराभव केला. त्याबरोबर या विजयाच्या जोरावर हंगामातील आपला दुसरा विजय नोंदवला. या सामन्यात हैदराबादला 166 धावांचे लक्ष्य मिळाले होते, जेव्हा संघ त्याचा पाठलाग करण्यासाठी आला तेव्हा 23 वर्षीय अभिषेक शर्माने केवळ 12 चेंडूत 37 धावांची खेळी करत सामना पूर्णपणे एकतर्फी केला. त्याच्या या खेळीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने हे लक्ष्य केवळ 18.1 षटकांत 4 गडी गमावून पूर्ण केले. या दरम्यान अभिषेकने ख्रिस गेल आणि सुनील नरेन यांच्या नावावर असलेला एक विक्रमही मोडीत काढला.
चेन्नईच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सनरायझर्स हैदराबाद संघ मैदानात उतरला, तेव्हा अभिषेक शर्माने डावाचे दुसरे षटक टाकण्यासाठी आलेल्या मुकेश चौधरीविरुद्ध आक्रमक पवित्रा स्वीकारला. त्याने या षटकात 3 षटकार आणि 2 चौकारांसह एकूण 26 धावा केल्या. यासह, तो आयपीएलच्या इतिहासात एका डावाच्या दुसर्या षटकात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे. त्याने याबाबतीत वेस्ट इंडिजचे दिग्गज ख्रिस गेल आणि सुनील नरेन यांना मागे टाकले.
यापूर्वी हा विक्रम सुनील नरेन आणि ख्रिस गेलच्या नावावर होता, या दोन्ही खेळाडूंनी 24-24 धावा केल्या होत्या. या हंगामाता आतापर्यंत अभिषेकचा फॉर्म खूपच चांगला आहे, ज्यामध्ये तो 161 धावांसह ऑरेंज कॅपच्या शर्यतीत पाचव्या स्थानावर पोहोचला आहे, ज्यामध्ये त्याने 217.57 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या आहेत.
अभिषेकने मोडला गेल-नरेनचा विक्रम
