‌‘जलजीवन’ च्या अपुर्ण कामांबाबत आ. जयंत पाटील आक्रमक

पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली कबुली

| अलिबाग | प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यातील अपुऱ्या जलजीवन कामांकडे शेकापचे आ. जयंत पाटील यांनी विधान परिषदेच्या सभागृहाचे लक्ष वेधले. अपुऱ्या कामांमूळे सर्वसामान्यांवर होणाऱ्या परिणामांबाबत आक्रमक भूमिका घेत ही कामे तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली. त्यामुळे जिल्ह्यातील प्रलंबित कामे लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे.

पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी केंद्र सरकार पुरस्कृत रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या माध्यमातून जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना जिल्ह्यात राबविण्यात आल्या. गेल्या वर्षभरापासून या योजनांच्या कामांना सुरुवात करण्यात आली. एक हजार 422 पाणी पुरवठा योजना राबविण्यात आल्या. त्यापैकी 310 योजनांची कामे पुर्र्ण झाली असून उर्वरित एक हजार 112 गावे अद्याप पाण्याच्या प्रतिक्षेत आहेत. जिल्ह्यात काही ठिकाणी कामे न करताच ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून बील काढण्यात आली आहेत. काही ठिकाणी जुन्याच योजनेतील पाईपलाईनचा वापर करून नवीन योजना राबविल्या जात असल्याची बाब आ. जयंत पाटील यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. जलजीवन मिशनअंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांचा दर्जा निकृष्ट असून संबंधितांविरोधात तक्रार करूनही कोणतीही कार्यवाही केली जात नसल्याची बाब सभागृहाच्या लक्षात आणून दिली.

आ. जयंत पाटील यांनी प्रश्नांचा भडीमार करून पाण्याच्या प्रश्नाबाबत सभागृहाचे लक्ष वेधले. यावेळी पाणी पुरवठा मंत्री गुलाबराब पाटील यांनी दुजोरा देत 317 योजना भौतिक व आर्थिकदृष्ट्या पुर्ण झाल्या आहेत. त्या देखभाल दुरुस्तीसाठी ग्रामपंचायतीकडे वर्ग केल्या आहेत. 867 योजनांची कामे प्रगतीपथावर असून 16 योजनांची कामे सुरु करण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यात येत आहे. प्रगतीपथावर असलेल्या कामांवर जागेच्या व वनविभागाकडील अडचणी येत आहेत. याबाबत जिल्हा स्तरावर वारंवार बैठका घेऊन अडचणी सोडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच जलजीवन अंतर्गत येणाऱ्या तक्रारीवर जिल्हा स्तरावर बैठक घेऊन तक्रारीचे निरसन करण्यात येत असल्याचे सांगितले.

यापूर्वीदेखील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आ. जयंत पाटील यांनी जलजीवन मिशनच्या कामांबाबत नाराजी व्यक्त केली. यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधींनी दुजोरा देत योग्य पध्दतीने कार्यवाही करण्यात यावी, अशी सूचना केली. त्यावेळी प्रशासन खडबडून जागे झाले. त्यांनी तालुका, जिल्हास्तरावर बैठका घेऊन जलजीवन मिशनचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, जिल्ह्यातील काही ठेकेदार आजही मनमानी कारभार करीत आहेत. योजना पूर्ण होऊनदेखील पाणी नाही, रस्त्याच्या कडेला पडलेले पाईप अशी अवस्था असल्याचे दिसून येत आहे.

Exit mobile version