पक्षी निरीक्षकांच्या नोंदी
। पाली/बेणसे। प्रतिनिधी ।
हवामान विभाग जसा पावसाचा अंदाज देतो. त्याचप्रमाणे निसर्गात विविध पक्षी, कीटक, प्राणी देखील पावसाचा अंदाज देत असतात. पक्ष्यांची घरटी बांधण्याची पद्धत, वापरलेले साहित्य व घरट्याची उंची यावरून पाऊस किती पडणार याचा अंदाज वर्तविणे सहज शक्य होते. जिल्ह्यात अशा प्रकारे पक्ष्यांची घरटी बांधण्याची लगबग सुरू झाली असून विणीच्या हंगामाला देखील सुरुवात झाली असल्याच्या नोंदी पक्षी निरीक्षकांनी नोंदविल्या आहेत. परिणामी यंदा जिल्ह्यात पाऊस लवकर व मुसळधार कोसळण्याची शक्यता आहे.
विळे येथील पक्षी निरीक्षक व निसर्ग अभ्यासक राम मुंढे यांनी येथील परिसर व जंगलात भटकंती करत असताना अशा अनेक घटनांच्या नोंदी केल्या आहेत. एप्रिल ते सप्टेंबर अनेक पक्ष्यांंच्या विणीचा हंगाम असतो, या हंगामात पक्ष्यांची घरटी बांधण्यासाठी रेलचेल चालू असते. कावळ्यांनी तर चक्क आपले घरटे बनवून त्यात अंडी उबवण्यासाठी आळी-पाळीने घरट्यातील मुक्काम वाढवला आहे. बहुतांशी घरटी झाडाच्या वरच्या भागात बांधली असून घरट्यांसाठी काटक्यांबरोबर तारांचा वापर अधिक केला आहे. पाटणुस येथील कुंडलिका विद्यालयाजवळ असणार्या एका मोठ्या झाडावर अगदी शेंड्याच्या जवळ कावळ्याने घरटे बांधून संसार थाटला आहे. तर आपली अंडी कावळ्याच्या घरट्यात टाकण्यासाठी कोकिळेची धावपळ दिसत आहे. विळे येथे मुंढे यांच्या घराच्या पाठीमागे गेल्या आठवड्यात कोकिळेचे चार नर व एक मादी हे एका झाडावर बसलेले होते आणि त्यांची कावळ्याच्या घरट्याच्या शोधात भटकंती चालू होती.
पाटणुस परिसरात पांढर्या छातीचा धीवर म्हणजेच खंड्या आपल्या मादी सोबत घरट्यासाठी जागेचा शोध घेऊन बीळ खोदण्याच्या तयारीला लागलेले असल्याचे निरीक्षण मुंढे यांनी नोंदविले आहे. मागच्या वर्षी जी पिल्लं घरट्यातून बाहेर पडली आहेत ती आता मोठी झाली आहेत. आणि त्यांनी आपले जोडीदार निवडून घरट्यासाठी जागा शोधणे चालू केले आहे. या ठिकाणी अशी चार ते पाच खंड्या पक्षाच्या जोडप्यांची घरटे बांधण्याची म्हणजेच बीळ खोदण्याचे काम चालू आहे.
दयाळ पक्षी देखील घरट्याच्या तयारीला लागले आहेत. कधी नर पक्षी पाण्यातील शेवाळ आणि काड्या गोळा करून जाताना दिसतो तर त्याच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून मादी देखील त्याला मदत करतांना दिसते. साळुंख्या देखील काट्या गोळा करून करून आपले घरटे बनवण्याच्या तय्यारीला लागल्या आहेत. त्यांच्या विणीच्या हंगामाची तयारी चालू आहे .
नारिंगी कस्तुर हा देखील आपल्या जोडीदाराला आकर्षित करण्याचा प्रयत्न करताना दिसतो आहे. महाभृंगराज या पक्ष्याने आपले घरटे घनदाट जंगलात तयार करून त्यातील अंडी उबवण्याचे काम चालू केले आहे. तर पांढर्या पोटाचा कोतवाल या पक्ष्याची पिल्ले घरट्यातून डोकावतांना दिसत आहेत. बुरख्या हळद्या या पक्ष्यांचे नर जंगलामध्ये झाडाच्या उंच फांदीवर बसून शीळ मारत मादीचा शोध घेत आहेत. अशा नोंदी देखील नोंदविण्यात आल्या आहेत.
निसर्गाचे संकेत
ही सर्व निरीक्षणे पक्षांच्या बाबतीतील आहेत. मात्र पक्षां प्रमाणेच घरातील काळ्या व लाल मुंग्या आपले खाद्यान्न सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी जागेचा शोध घेत आहेत. तसेच शेकडोंच्या संख्येने खाद्यान्न घेऊन जाताना त्यांची रेलचेल दिसते आहे. बहावा, ताम्हण, कवची/कौसी, पांगारा, पळस, सावरी या झाडांना अगदी योग्य वेळेत फुलांचा बहर आला आहे. हे सर्व संकेत यंदा पाऊस लवकर व मुसधार बरसण्याचे आहेत.
निसर्ग हा अशा प्रकारे प्रत्येक ऋतूचा अंदाज देत असतो. धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनामध्ये माणसाने या निसर्गाकडे कानाडोळा केल्यामुळे सध्यस्थितीत निसर्ग निरीक्षणाचा अभ्यास कमी झाला आहे. त्यामूळे माणसाला जरी नाही समजले तरी प्राणी, पक्षी, कीटक आणि वनस्पती यांना मात्र निसर्गचक्र पूर्णपणे समजते. त्यामुळे निसर्गातील ही रेलचेल पाहून असा अंदाज येतो की या वर्षी वरुण राजा धो-धो कोसळणार आहे.
रामेश्वर श्रीराम मुंढे, पक्षी अभ्यासक, विळे,
