| माणगाव | प्रतिनिधी |
पावसाळा ऋतू सुरु झाला की निसर्गात विविध प्रकारचे बदल होतात. मानव, पशू-पक्षी, प्राणी पावसाळ्याच्या आगमनाबरोबर दैनंदिन जीवनात विविध प्रकारचे बदल करतात. पाऊस सुरू होण्यापूर्वी मानव तसेच अनेक पशू पक्षी निवारा शोधतात. पक्षीही पावसाबरोबर स्वतःसाठी व नवीन प्रजननासाठी घरटी बांधतात. पक्ष्यांची ही घरटी म्हणजे कलाकुसरीचा अद्भुत नमुनाच असतो. पावसाळा सुरू झाल्यावर झाडात, जाळींमध्ये, झुडपात, बाबूंच्या बेटात अनेक पक्ष्यांची घरटी दिसत असून, त्यांची घरटी पाहणे हे एक आनंददायी व कुतूहल जगविणारे आहे.पावसाळ्यात उपलब्ध होणाऱ्या अनेक वनस्पती, गवत, पाने, काड्या तसेच इतस्ततः मिळणाऱ्या वस्तूंचा उपयोग करून पक्षी ही घरटी बांधतात. लहान, मोठे पक्षी आपली चोच व नख्यांचा उपयोग करून ही घरटी बांधतात. झाडातील ढोली, पाने, फांदीचा आकार यांचा विचार करून पक्षी घरटे बांधण्यासाठी योग्य जागा निवडतात.
पक्ष्यांचे हे घरटे बांधकाम म्हणजे निसर्गाची एक अद्भुत किमया असून, सारेच पक्षी विविध प्रकारचे घरटे बांधतात. स्वसंरक्षण व नवीन प्रजननासाठी पक्षी ही घरटी बांधतात.अनेक पक्षी पावसाळ्यापूर्वी तर काही पक्षी पाऊस सुरू झाल्यावर घरटे बांधतात. अंडी घालणयासाठी, उबविण्यासाठी व पिलांचे संगोपन करण्यासाठी पक्षी या घरट्यांचा उपयोग करतात. नर पक्षी व मादी दोन्ही एकत्रित तर कधी फक्त नर अथवा मादी पक्षी घरटे बांधतात. ऐन पावसाळ्यात अनेक ठिकाणी दिसणारी ही घरटी निसर्ग पर्यावरणप्रेमींसाठी कुतूहलाचा विषय ठरत आहेत.
पावसाळ्यात व पावसापूर्वी पक्षी घरटी बांधण्यासाठी सुरूवात करतात. नखे, चोच यांचा उपयोग करून ते घरटे बांधतात. त्यांचे हे काम अतिशय नाजूक व कलाकुसरयुक्त असते. निसर्गाची अद्भुत किमया म्हणून त्याकडे पाहिले जाते. प्रजनन व संरक्षण, अन्न सुरक्षा यासाठी पक्षी घरट्याचा उपयोग करतात.
भरत काळे, निसर्गप्रेमी