। मुंबई । प्रतिनिधी ।
मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर महत्त्वाची बैठक पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीला देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्री गिरीश महाजन आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पण राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री या बैठकीला गैरहजर होते, अशी माहिती समोर येत आहे.
प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्याचा समारोप होत आहे. असे असताना महाराष्ट्रात आगामी काळात कुंभमेळा होणार आहे. येत्या 2027 मध्ये नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा असणार आहे. या कुंभमेळ्याला देशभरातील लाखो भाविक येत असतात. या कुंभमेळ्याच्या तयारीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृहावर महत्त्वाची बैठक बोलावली. पण या बैठकीला राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी गैरहजेरी लावल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.
या बैठकीला मंत्री गिरीश महाजन यांच्यासह मुख्य सचिव सुजाता सौनिक, नगरविकास आणि अर्थ विभागाचे मुख्य सचिव उपस्थित होते. यासोबत रेल्वेचे अधिकारी देखील उपस्थित होते. पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोन्ही प्रमुख नेते या बैठकीला गैरहजर होते. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी देखील यापूर्वी कुंभमेळ्याच्या तयारीसाठी बैठक घेतली होती. आता देवेंद्र फडणवीस हे बैठक घेत आहेत. पण आजच्या बैठकीत दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर राहण्यामागचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.
शिंदे नाराज?
नाशिक आणि रायगड जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदावरुन सुरु असलेल्या मतभेदामुळेदेखील एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा सातत्याने समोर येते. या घडामोडींनंतर आता सह्याद्रीवर पार पडलेल्या महत्त्वाच्या बैठकीत एकनाथ शिंदे हे गैरहजर असल्याची माहिती समोर येत आहे.