तालुक्यात वानरांचा उच्छाद

बागायतदार व नागरिक त्रस्त, वनविभाग बघ्याच्या भूमिकेत
| श्रीवर्धन । वार्ताहर ।
निसर्ग चक्रीवादळा नंतर श्रीवर्धन तालुक्यातील वनसृष्टी जवळजवळ नष्ट झाल्यात जमा आहे. अनेक मोठमोठी जंगले झाडे मोडून पडल्यामुळे व फांद्या तुटून गेल्यामुळे ओसाड झाली आहेत. त्यातच सरपणाच्या लाकडासाठी होणारी बेसुमार लाकूडतोड आणि लागणारे वणवे यामुळे वनसंपत्ती दिवसेंदिवस नष्ट होत चालल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक वर्षे जंगलामध्ये आपले वास्तव्य करून आपल्याला विविध फळ खायला मिळतील. यासाठी भटकंती करून ती फळे खाणारी वानरे व माकडे सध्या जंगलामध्ये काहीही मिळत नसल्यामुळे नागरी वस्तीकडे वळल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शहरातील नारळ सुपारीच्या वाड्यांमध्ये आठ ते दहा माकडांचा कळप एकदम येत असून, वाडीमध्ये पिकलेली केळी व विविध प्रकारची फळे यामध्ये जांभ, पेरू, चिकू फस्त करून टाकत आहेत.

शेवग्याच्या झाडावरती आलेली शेवग्याची फुले देखील ही माकडे व वानरे खाऊन टाकत आहेत. त्यामुळे बागायतदारांसह नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहेत. श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्‍वर, मारळ परिसरात देखील माकडांचा व वांनरांचा उच्छाद मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. नारळाच्या तयार केलेल्या नवीन रोपांमधील कोंब देखील ही वानरे व माकडे खात असल्याचे निदर्शनास येत आहे. तर अनेकांच्या घरांवरती माकड उड्या मारून पत्रे फोडणे, कौले फोडणे इत्यादी प्रकार सुरू आहेत. तसेच काही नागरिकांच्या घरी माकडे त्रास देतात म्हणून जेवण शिक्यामध्ये टांगून ठेवलेले असते. अशा घरांमध्ये कौले काढून घरात शिरून त्या ठिकाणी ठेवलेले अन्न देखील ही माकडे फस्त करत असतात. वनविभागाचे कर्मचारी अन्य कोणत्याही ठिकाणी चाललेल्या गोष्टींवर लक्ष ठेऊन असतात. वनविभागाने मात्र या सर्व प्रकाराकडे बघ्याची भूमिका घेतली असल्यामुळे माकड चाळे करणार्‍या वानरांवर व माकडांवर पकडण्यासाठी किंवा त्यांना पिटाळून लावण्यासाठी कोणतीही उपाययोजना वनविभागाकडून करण्यात येत नाही. तरी वनविभागाने वानरांचा व माकडांचा योग्य तो बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

कर्जतमध्ये मुलाला घेतला चावा
शहरात भटक्या कुत्र्यांचा तसेच मोकाट जनावरांचा त्रास नागरिकांना सोसावा लागतो त्यातच आता माकडांची भर पडली असून या माकडांनी अबालवृद्धांना लक्ष केले आहे. ही माकडे माणसांच्या अंगावर धावून चावा घेत असल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली असून वन खात्याने व नगरपरिषद प्रशासनाने या माकडांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक व छत्रपती शिवाजी राजे तक्रार निवारण संघटना करीत आहे.

सुरुवातीला एक माकड कर्जत शहरात आले. ते शहरभर भटकत असे मात्र त्याचा त्रास कुणाला नव्हता. इमारतींच्या गच्चीवर किंवा गॅलरीत ते वावरत असे. अनेकजण त्याला खायला देत असत. मात्र गेल्या काही दिवसांपासून आणखी काही माकडे शहरात आली आणि त्यांनी आपले कारनामे सुरू केले. एका बालकाच्या अंगावर जाऊन त्याच्या डोक्याचा चावा घेऊन त्याला जखमी केले तर महावीर पेठेत मुकुंद मेढी यास 70 वर्षांच्या ज्येेष्ठ नागरिकांच्या अंगावर धावून जाऊन त्यांच्याही चावा घेतल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.

या माकडांच्या दहशतीमुळे लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक, व्यापारी, फेरीवाले तसेच नोकरीसाठी मुंबई-पुण्याकडे जाणार्‍या-येणार्‍या प्रवासी व चाकरमान्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले असून या माकडांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी छत्रपती शिवाजी राजे तक्रार निवारण संघटने कडून करण्यात येत आहे. दरम्यान माकडांना पकडण्यासाठी बदलापूर वन विभागाकडून वन कर्मचार्‍यांची टीम आली आहे. ते या उपद्रवी माकडांचा शोध घेत असून नागरीकांनी त्यांना सहकार्य करावे. अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Exit mobile version