| श्रीवर्धन | वार्ताहर |
येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सात दिवसीय निवासी शिबीर मेघरे-भरडोली येथील राजिप शाळेत दि. 05 ते 11 फेब्रुवारी संपन्न झाले. या शिबिराचे नेतृत्व उपप्राचार्य व एनएसएस कार्यक्रम अधिकारी, प्रा. किशोर लहारे व प्रा. नवज्योत जावळेकर यांनी यशस्वीपणे केले. या निवासी शिबीरात अनेक उपक्रम राबविण्यात आले.
5 फेब्रु रोजी प्राचार्य डॉ. श्रीनिवास जोशी यांच्या अध्यक्षतेखाली सरपंच बाळकृष्ण हरपाळ, यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या शिबिरात मेघरे, बौद्धवाडी, आदर्श वाडी, दिपक वाडी येथील ग्राम स्वच्छता, शाळा परिसर स्वच्छता, क्रीडांगण दुरुस्ती, वनराई बंधारा, महिलांसाठी हळदीकुंकवाचा कार्यक्रम, श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयाकडून आरोग्य चिकीत्सा, व ’नेत्रदान-समज-गैरसमज’ या विषयावर डॉ. ढालाईत यांचे मार्गदर्शन, ग्रामस्थांसाठी स्वयंसेवकांचे सांस्कृतिक कार्यक्रम, वृक्षसंवर्धन असे विविध कार्यक्रम पार पडले. या शिवाय वैयक्तिक स्वच्छता, व्यायाम, योगासन, प्रार्थना, श्रमदान,सहभोज, विविध विषयांवर मार्गदर्शन व प्रबोधन विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.
यावेळी श्रीवर्धन तालुका शिक्षणाधिकारी नवनाथ साबळे व राजिप सदस्य, मंगेश कोमनाक, सरपंच-उपसरपंच, पोलीस पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य, राजिप शाळा मुख्याध्यापक व सर्व शिक्षक, शाळा केंद्र प्रमुख श्री. बिराडी व ग्रामस्थ, महाविद्यालयाचे प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एनएसएस कार्यक्रम अधिकारी, उपप्राचार्य प्रा. किशोर लहारे होते. या सात दिवसांत शिबिरार्थी एनएसएस स्वयंसेवकांची भूमिका व प्रा. डॉ.श्रीनिवास जोशी यांचे मार्गदर्शन महत्वाचे ठरले. या शिबीराच्या यशस्वी आयोजनाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.