मयूर शेलार यांनी वचन पाळले; बोअरवेलद्वारे मुबलक पाणी उपलब्ध
| रसायनी | प्रतिनिधी |
रसायनी परिसरातील आपटा ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील घेरावाडी या दुर्गम आदिवासी वाडीत दीर्घकाळापासून पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या होती. विशेषतः महिला वर्गाला दूरवरून पाणी आणावे लागत असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. ही समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी पनवेल पंचायत समिती सदस्य मयूर शेलार यांनी पुढाकार घेतला. निवडणूक काळात दिलेले वचन पाळत त्यांनी घेरावाडीतील पाणीप्रश्न मार्गी लावला. पंचायत समितीच्या सभापती रंजना वास्कर यांच्या सहकार्याने मयूर शेलार यांच्या माध्यमातून येथे बोअरवेल खोदून मुबलक पाण्याची व्यवस्था करण्यात आली.
या उपक्रमामुळे ग्रामस्थांची अनेक वर्षांची पाणीटंचाई दूर झाली असून, नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. कार्यक्रमावेळी माजी उपसरपंच ज्ञानेश्वर भोईर, ग्रामपंचायत सदस्य मारुती चव्हाण, दामू माडे, दर्शन भाईर, राजू देशमुख, पाणीपुरवठा विभागाचे चव्हाण, ग्रामसेवक कैलास मोरे, जनार्दन सावंत, गणपत पिरकड, आयत्या माडे, संतोष पारधी यांच्यासह घेरावाडीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
