| अहिल्यानगर | प्रतिनिधी |
अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर शहरात भयानक घटना घडली आहे. कनिष्ठ महाविद्यालयात शिकणाऱ्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर उपचार करण्याच्या बहाण्याने डॉक्टरने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
कनिष्ठ महाविद्यालयात शिकणाऱ्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला शुक्रवारी (दि.04) श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने तिला डॉ. कर्पे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. यानंतर तिच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर तिला रविवारी (दि.06) पहाटेच्या सुमारास डॉक्टरांनी मुलीच्या प्रकृतीची चौकशी केली. त्यानंतर डॉक्टर त्या मुलीला टेरेसवर घेऊन गेले. तिथे गेल्यावर डॉक्टरांनी मुलीसोबत गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. मुलीने अनेकदा विरोध केला. मात्र, डॉक्टरांनी तिच्यावर बळजबरीने अत्याचार केले. अमोल करपे असे डॉक्टरचे नाव आहे. या घटनेमुळे संगमनेर परिसरात एकच खळबळ उडाली. यानंतर कुटुंबीयांना माहिती समजतात कुटुंबीयांनी रुग्णालयात धाव घेतली. यावेळी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन घटनेची माहिती घेतली. डॉक्टर अमोल कर्पे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीत अत्याचार केल्यानंतर डॉक्टरने याबाबत कोणालाही काही सांगितल्यास तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिल्याचे देखील म्हटलं आहे.
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून रविवारी डॉक्टर फरार झाला. या घटनेनंतर आरोपी फरार असल्याने संगमनेर शहर पोलिसांनी तात्काळ पथक पाठवून नाशिक येथून रात्री डॉक्टरला ताब्यात घेतलं आहे. या घटनेनंतर काही वेळ हॉस्पिटल बाहेर गोंधळ देखील निर्माण झाला होता. त्यानंतर या हॉस्पिटलच्या जवळ पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता. या घटनेप्रकरणी संबंधित डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस अधिक तपास करत आहेत.