अल्पवयीन विद्यार्थिनीवर शिक्षकाकडून अतिप्रसंग

। पालघर । प्रतिनिधी ।

नालासोपारा पूर्वेकडील संतोष भवन परिसरात एका 14 वर्षीय विद्यार्थिनीवर शाळेत आणि शिकवणीमध्ये शिकवणार्‍या शिक्षकाने अनेकवेळा शारीरीक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अमित दुबे (30) असे या शिक्षकाचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे.

आरोपी अमित दुबे हा नालासोपारा पूर्वेच्या संतोषभुवन येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षक असून, तो वालईपाडा येथे उज्वल नावाचे खासगी क्लासेस चालवतो. त्याच्या शाळेत शिकणार्‍या एका 14 वर्षीय विद्यार्थिनीला क्लासमध्ये शिकवण्याचा बहाण्याने बोलावून तिच्यावर अतिप्रसंग केला. याबाबत कोणालाही सांगू नकोस अशी तिला धमकी दिली होती.

मार्च महिन्यापासून ते जुलैपर्यंत असे 5 महिने या अमित दुबेने अतिप्रसंग केल्याची पीडित विद्यार्थिनींची तक्रार आहे. वारंवार होणारा अत्याचार सहन न झाल्याने पिडीतेने आपल्या आईला हा प्रकार सांगितला. त्यानंतर तिच्या कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. याप्रकरणी तक्रारीवरून आरोपी अमित दुबे याच्या विरोधात पेल्हार पोलीस ठाण्यात बलात्कार आणि पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून, त्याला अटक केली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी दिली.

Exit mobile version