नेरळ पोलिसांकडून आरोपीला अटक
। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील नागेवाडी पाथरज येथील मूकबधिर विवाहितेवर तिच्याच सासऱ्याने अतिप्रसंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपी सासऱ्याला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नागेवाडी येथील 23 वर्षीय विवाहित महिला मूकबधिर आहे. तिच्या 49 वर्षीय सासऱ्याला या परिस्थितीची पूर्ण माहिती होती. याचाच गैरफायदा घेत त्याने सुनेला माहेरी सोडण्याच्या बहाण्याने गाडीत बसवले. माहेरी नेण्याऐवजी आरोपीने तिला नेरळच्या दिशेने आणले. त्यानंतर कशेळे- नेरळ रस्त्यावरील एका लॉजमध्ये नेऊन तिच्यावर अतिप्रसंग केल्याचा आरोप आहे. घटनेनंतर पीडित विवाहितेने नेरळ पोलीस ठाण्यात जाऊन घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वरोटे करीत आहेत.






