| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील हालिवली गावातील वाघरज या रस्त्याबाबत सातत्याने मागणी करून देखील प्रशासन कोणतीही कार्यवाही करताना दिसत नाही. शेवटी त्या भागातील कठडे नसलेल्या पुलावरून एक आदिवासी वृद्ध व्यक्ती खाली कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला आहे.
हालीवली परीसरातील वाघरज येथील जैतू मानकू पवार यांचा सोमवारी (दि.24) कठडे नसलेल्या ब्रिजवरून पडून दुर्दैवी मृत्यू झाला. ब्रिजवरील खड्ड्यात प्रचंड चिखल साचल्याने, तो चुकविण्यासाठी कठड्याच्या बाजूने जात असताना तोल जाऊन ते नाल्यात पडले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला आहे. या परीसरातील या वाडीकडे जाणारा रोड लवकर दुरुस्त करा, शाळेत जाणाऱ्या मुला-मुलींना चिखलामुळे, खड्ड्यांमुळे जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. याची सततची मागणी पत्रकार प्रशासनाकडे करत होते, तर तहसिलदारांना वारंवार फोन करून कल्पना दिली होती. परंतु, प्रशासनाकडून ठोस कारवाई न झाल्याने अखेर एका निष्पाप नागरीकाचा बळी गेला आहे. या रस्त्यावर वारंवार गुडघाभर खड्डे पडले आहेत. हालीवली ग्रामपंचायतीकडे या रस्त्यासाठी खर्च करायला पैसे नाहीत असे उत्तर हालीवली ग्रामसेवकांनी दिल्याने या वाडीतील ग्रामस्थांसाठी प्रशासनाने हात वर केले आहेत. मात्र, प्रशासनाने या रस्त्याकडे पाहिले नसल्याने आदिवासी वृद्धाचा मृत्यू झाला असून, आता तरी तेथील आदिवासी लोकांची वाट दुरुस्त करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते यांनी केली आहे.






