| खांदा कॉलनी | प्रतिनिधी |
श्रावण महिन्यात धार्मिक पूजा-अर्चा आणि विविध व्रतवैकल्यांना विशेष महत्त्व दिले जाते. या काळात अनेक कुटुंबांमध्ये घरात धार्मिक विधी आणि पूजा मोठ्या श्रद्धेने केली जाते. पूजेनंतर नैवेद्य तसेच भोजनासाठी केळीच्या पानांचा वापर करण्याची परंपराही अनेक घरांमध्ये आहे. त्यामुळे श्रावणाच्या पार्श्वभूमीवर पनवेलच्या भाजी मार्केटमध्ये केळीच्या पानांची आवक वाढू लागली आहे.
ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर केळीची पाने बाजारात दाखल होत आहेत. विशेषतः सोमवारच्या दिवशी या पानांना अधिक मागणी राहण्याची शक्यता आहे. पूजा, नैवेद्य आणि धार्मिक कार्यक्रमांसाठी नागरिकांकडून केळीची पाने खरेदी केली जात आहेत. श्रावण महिन्यातील पुढील सोमवारांनाही मागणी कायम राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. सणासुदीच्या काळात बाजारपेठेत धार्मिक साहित्याबरोबरच पूजेच्या साहित्याचीही उलाढाल वाढत आहे. त्यामुळे पनवेलच्या भाजी मार्केटमध्ये श्रावणाची चाहूल जाणवू लागली आहे. श्रावणाच्या पहिल्या सोमवारसाठी नागरिकांची बाजारपेठेत खरेदीची लगबग सुरू झाली आहे.
नागरिकांच्या खिशाला झळ
श्रावण महिना सुरू झाला की व्रतवैकल्य सुरू होतात. या दिवसांमध्ये केळीच्या पानांचा नैवेद्यासाठी आणि जेवणासाठी उपयोग केला जातो. यामुळे केळीच्या पानांना मागणी वाढली आहे. रानकेळीच्या पानांच्या किमती वाढल्या आहेत. यापूर्वी 10 ते 20 रुपयांमध्ये मिळणारी रानकेळीची पाने आता 50 ते 100 रुपयांना तीन मिळू लागली आहेत. यामुळे नागरिकांच्या खिशाला झळ बसत आहे.
आदिवासींना रोजगार
डोंगराळ भागात नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या केळीच्या पानांमुळे आदिवासींना खासकरून श्रावण महिन्यात रोजगार मिळत आहे.







