| महाड | प्रतिनिधी |
महाड तालुक्यातील कोळसे या गावात जमिनीच्या वादातून एका दलित महिलेला जातीवाचक शिवीगाळ व धमकी दिल्या प्रकरणी तसेच तिच्या अंगावर गाडी घालून तिला मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पाच जणांवर महाड शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी श्रद्धा सुशील जाधव मूळ र.कोळसे, यांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे.
श्रद्धा जाधव यांच्या तक्रारीवरून या महिलेचे सासरे नथुराम जाधव यांची कोळोसे येथे 34 गुंठे जागा आहे. या गावातील राजेंद्र मोर्या यांनी नथुराम जाधव यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन ही जागा आपल्या नावावर करून घेतली. त्यामुळे या दोघांमध्ये जागांवरून वाद सुरू होते. यातूनच या महिलेला 10 जानेवारी ,21 जानेवारी, 16 मे व 29 मे 2022 या दिवशी तसेच वेळोवेळी राजेंद्र मोर्या व इतर शिवीगाळ करत असत व धमकी देखील देत असत. याशिवाय ही महिला दलित आहे असे माहिती असताना देखील जातीवाचक शिवीगाळ करून तिचा अपमान देखील केला जात असे.
तसेच मोर्या यांचे नातेवाईक व सहकारी देखील या महिलेला शिवीगाळ करत असत. या सर्वांकडून या महिलेच्या अंगावर चार चाकी गाडी घालून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न देखील करण्यात आल्याचे श्रद्धा जाधव यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे. त्यांच्या तक्रारीनुसार महाड शहर पोलीस ठाण्यामध्ये राजेंद्र मोर्या, गुलाबी मोर्या, रवी मोर्या नीलम मोर्या (सर्व रा.कोळोसे)व भूपेश देवळेकर (रा. नाते) यांच्यावर महाड शहर पोलीस ठाण्यामध्ये शिवीगाळ करणे, दमदाटी करणे , ट्रॉसिटी फसवणूक या नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे हे करत आहेत.







