। कर्जत । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी शुक्रवारी (दि.23) तालुक्यातील सर्व गावांमध्ये ई-पीक पाहणीसाठी एक दिवसीय विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे.
महाराष्ट्र शासनाने शेतकर्यांच्या सुविधेसाठी आपल्या शेतातील पीक पेरा आपण स्वतः ई-पीक पाहणी या मोबाईल अॅपद्वारे भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. मागील खरीप व रब्बी हंगामामध्ये कर्जत तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकर्यांनी आपल्या शेतातील ई-पीक पाहणी स्वतः नोंदवली आहे. यावर्षी खरीप हंगामामध्ये आपल्या शेतामध्ये जे पीक पेरले आहे त्याची पिक पाहणी ही ई-पिक पाहणी मोबाईल अॅपद्वारे नोंदवावी व आपला सातबारा वरील पेरा अद्ययावत करावा. आपल्या सातबार्या वरील पीक पेरा अद्ययावत असणे हे शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. यासाठी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर व उप विभागीय अधिकारी कर्जत अजित नैराळे यांचे मार्गदर्शनाखाली एक दिवसीय विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी प्रत्येक गावामध्ये कोतवाल, तलाठी हे उपस्थित राहून शेतकर्यांना ई-पीक पाहणी करण्यासाठी मार्गदर्शन करतील. मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी तालुक्यातील गावांना भेटी देणार आहेत.
गावातील सर्व ग्रामसेवक, कृषी सहायक, सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, स्वस्त धान्य दुकानदार या सर्वांनी तसेच त्या गावातील सर्व शेतकर्यांनी ई-पिक पाहणी मोहिमेमध्ये सहभाग घेऊन गावातील खरीप पिक पेर्याची 100 टक्के ई-पिक पाहणीची अँपमध्ये नोंद होईल यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन कर्जत तहसीलदार डॉ. शीतल रसाळ यांनी केले आहे.