पाली-पाटणूस राज्यमार्ग रुंदीकरणाला वेग

दुर्गम भागातील वाहतूक होणार सुरळीत
। सुधागड-पाली । वार्ताहर ।
अष्टविनायक तीर्थक्षेत्र पाली ते पाटणूस राज्यमार्ग क्रमांक 94 या मार्गाच्या रुंदीकरणाला नुकतीच सुरुवात झाली आहे. नवीन वर्षाच्या अखेरीस या रुंदीकरणाचे काम 60 टक्के पूर्ण होण्याची शक्यता सार्वजनिक बांधकाम विभागाने वर्तविली आहे. या मार्गाचे रुंदीकरणामुळे येथील गावे व दुर्गम भागातील वाहतूक सुरळीत होणार आहे. शिवाय येथील पर्यटन व रोजगार निर्मितीला अधिक चालना व गती मिळेल. नुकतेच या मार्गासाठी 2 कोटी 72 लाख 11 हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. या मार्गासाठी राज्य शासन 60 टक्के खर्च करणार असून 40 टक्के खर्च कॉन्ट्रॅक्टर करणार आहे. या मार्गाची सध्या रुंदी साडेपाच मीटर आहे. रुंदीकरणाद्वारे ती बाजू पट्टी वगळून 7 मीटर एवढी होईल. म्हणजे 7 मीटर रुंदीचा निव्वळ डांबरी रस्ता होणार आहे. पाली हे अष्टविनायक तीर्थक्षेत्र आहे. येथे विविध भागांतून मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. या मार्गाचे रुंदीकरण झाल्यास पुण्यावरून ताम्हिणी घाटमार्गे व तळ कोकणातून माणगाव मार्गे पालीत येणार्‍या भाविकांचा प्रवास जलद व सुखकर होईल. शिवाय विळे-भागाड एमआयडीसी जवळच पाटणूस गाव असल्याने आजूबाजूच्या गावांतील तरुणांना रोजगारासाठी सहज येजा करता येईल.


पाली येथे शिक्षणासाठी येणारे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची देखील चांगली सोय होईल. त्यांचा प्रवास जलद होईल. पाटणूस हद्दीत देवकुंड हे जगप्रसिद्ध निसर्ग पर्यटन क्षेत्र आहे. या मार्गाच्या रुंदीकरणामूळे येथे पोहचण्यास पर्यटकांना सोप्पे जाईल. त्यामुळे येथील पर्यटन वाढून रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील. पाली पाटणूस मार्गावरून विळे मार्गे पुणे आणि माणगावला देखील जाता येते. त्यामुळे मुंबई-पुणे तसेच कोकणात जाण्या-येण्यासाठी हा मार्ग महत्वाचा व सोईचा आहे. एकूणच या मार्गाच्या रुंदीकरणामूळे येथे आमूलाग्र बदल घडून येईल. वनविभागाच्या परवानग्या, खाजगी जागा हस्तांतरण योग्य प्रकारे झाल्यास व अचानक कोणती समस्या न उद्भवल्यास मार्ग लवकर पूर्ण होईल.

Exit mobile version