तालुक्यात शेतीच्या कामांना वेग

बळिराजाची कापणी, झोडणीची लगबग; यंदा मध्यम भातपीक हाती येणार


| मुरूड जंजिरा | वार्ताहर |

मुरूड तालुक्यात तयार झालेल्या भातशेतीच्या कापणीची लगबग सर्वत्र दिसून येत आहे.तर काही ठिकाणी भात कापून झोडणीची लगबगदेखील पाहायला मिळत आहे. अवकाळी पाऊस, भातावर आलेली खोड कीड यामुळे भाताचे उत्पादन कमी निघेल असे दिसून येते. त्यामुळे मध्यम पीक आल्याची माहिती शिघ्रे गावचे ज्येष्ठ शेतकरी आणि रायगड स्टॅम्पवेंडर संघटनेचे जिल्हा संघटक रघुनाथ माळी यांनी रविवारी बोलताना दिली. तालुक्यात तीन हजार हेक्टरवर भातशेती केली जाते.

यंदा सर्वत्र भातशेती तरारून आली असली तरी भाताच्या दाण्यात पोंजीपणादेखील दिसून येत आहे. दिवाळीपूर्वीच भातशेती तयार झाली असून, खारआंबोली, नागशेत, शिघ्रे, वाणदे, जोसरांजन, विहूर, वावडूंगी, तेलवडे, उंडरगाव, गोयगाव, आदाड, मजगाव, उसरोली, वाळवंटी, नांदगाव, चिंचघर आदी विविध भागांतील भातशेती परिपक्व झाल्याने कापणीची लगबग सुरू आहे. भातशेती कापून झाल्यावर भाताचे भारे शेतातच रचले जात आहेत. भाताचे भारे बांधून शेतात एकमेकांवर रचून मळणी रचली जाते. या प्रकाराला ‌‘उरवी’देखील म्हटले जाते. भात झोडणीसाठी त्वरित मजूर मिळत नसल्याने शेतात भात भारे रचावे लागतात, अशी माहिती रघुनाथ माळी यांनी दिली. जमिनीत ओलावा असल्याने अनेकांना मार्ग नसल्याने भात वाहून नेताना अडचणी येत असतात. त्यामुळे मळणी रचून काही दिवसानंतर भात भारे झोडून भात घरी आणावे लागते. मुरूडमधील शेतकरी आदेश दांडेकर यांनी सांगितले की, उडवी रचण्यासाठी कसबी मजूर लागतात. मळणीचे गोलाकार थर रचताना रानटी प्राणी, गुरे ढोरे मळणीची नासधूस करणार नाही अशा प्रकारे उडवीची रचना करण्यात कसबी मजुरांचा रोल महत्त्वाचा असतो, असे दांडेकरांनी सांगितले.

मुरूड तालुक्यातील शिघ्रे- खारआंबोली पंचक्रोशीत तयार भातशेतीची कापणी होऊन झोडणीदेखील सुरू असल्याचे रविवारी दिसून आले. मुरूड तालुक्यात बहुतांश ठिकाणी पारंपरिक पद्धतीने भात झोडणी केली जाते. म्हणजे शेतात ताडपत्री अंथरून लाकडाचा ओंडका, दगड पिंप यावर भाताचे भारे आपटून भाताचा दाणा अलग केला जातो. उत्तम भात दाणा आणि पोंजा भात दाणा झोडताना बाजूला काढला जातो. कापणी, झोडणीसाठी पटेलफेर पद्धतीने मजूर सहाय्य घेतले जाते. यामुळे खर्च कमी होतो. दरवर्षी मे, जूनपासून या भागात शेतीच्या पूर्वतयारीसाठी कामे सुरू होतात. भातशेतीसाठी खूप खर्च येतो. त्या मानाने शेतकऱ्याला मेहताना अथवा उत्पन्न कमी मिळते. तरीही हाती आलेल्या पिकावर समाधान व्यक्त करतो. हीच येथील बळिराजाची खासियत आहे. या भागात यांत्रिक पद्धतीने भात काढण्यासाठी यंत्रणादेखील दिसून येत नाही, अशी माहिती रघुनाथ माळी यांनी दिली.

Exit mobile version