। अलिबाग । वार्ताहर ।
अलिबागहून मुंबईत जाण्यासाठी सोयीस्कर मार्ग म्हणून अनेकजण लाँचचा वापर करतात. यामुळे वेळेची व पैशाचीही बचत होते. गेली कित्येक वर्षे अजंटा कॅटमरान या मार्गावरुन प्रवाशांना ने-आण करीत आहे. या लाँचमध्ये अनेक अपघात घडल्याचेही वारंवार समोर आले आहे.
प्रवासी वाहतूक करीत असताना लाँचची देखभाल व दुरुस्ती वेळोवेळी करीत नसल्याने हे अपघात घडल्याचे सिद्ध झाले आहे. असाच एक प्रकार मंगळवारी (दि.8) घडला. अजंटा लाँचचे लाकूड तुटल्याने प्रशांत कांबळे हा प्रवासी पाण्यात पडला. त्या प्रवाशाला पोहता येत असल्याने त्याचा जीव वाचविणे शक्य झाले. मात्र या घटनेमुळे प्रवाशांनी लाँच मालक व चालकाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. तसेच याप्रकरणी सखोल चौकशी करुन कारवाई करण्याची मागणीही प्रवाशांकडून करण्यात येत आहे.