। पोलादपूर । प्रतिनिधी ।
मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटाला पर्यायी भुयारी मार्गातील रस्ता चिखलमय आणि निसरडा झाल्याने बोगद्यात दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. रविवारी दुपारी झालेल्या या अपघातानंतर एकाच भुयारी मार्गातून दुहेरी वाहतूक सुरू झाल्यानंतर दुचाकीचा अपघात होण्याची तिसरी घटना झाल्याचे कातळी भोगाव येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
दुचाकीस्वार भानुदास लक्ष्मण कारभळ हा आपल्या ताब्यातील अॅक्टिवा दुचाकी घेऊन कापूरघोळ ते खेड असे जात असताना कशेडी घाटाला पर्यायी भुयारी मार्गामध्ये आला. यावेळी गळणार्या भुयारी मार्गामुळे काँक्रीटचा रस्ता निसरडा होऊन त्यावरून स्कूटर घसरल्याने दुचाकीस्वार भुयारीमार्गाच्या कठड्यावर आपटून गंभीररित्या जखमी झाला.
अपघाताची माहिती समजताच, कशेडी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक समेळ सुर्वे, सहाय्यक फौजदार सचिन सावंत, पोलीस हवालदार शंकर कुंभार, गजानन रामागडे, संजय चिकणे यांच्यासह पोलादपूर पोलीस ठाण्याचे ठाणे अंमलदार बामणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी दुचाकीस्वारास पोलादपूर ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. यावेळी दुचाकीस्वार भानुदास कारभळ याच्या डोक्याला गंभीर स्वरूपाची इजा झाल्याने त्याच्यावर पुढील उपचार करण्यासाठी त्याला डेरवण येथील श्रीसद्गुरू दिगंबरदास चॅरिटेबल ट्रस्टच्या रूग्णालयामध्ये हलविण्यात आले.