। माणगाव । वार्ताहर ।
माणगाव रेल्वे स्टेशनजवळ कुलस्वामिनी प्लाझाच्या समोर मुंबई-गोवा महामार्गावर तीन वाहनांमध्ये धडक लागून झालेल्या अपघातात दोन जण जखमी झाले आहेत. अपघातातील दुचाकी व रिक्षा या दोन वाहनांचे नुकसान झाले. सदर अपघात शनिवार दि.12 फेब्रुवारी रोजी दुपारी 12:10 वाजण्याच्या सुमारास घडला. याबाबतची फिर्याद शैलेश बबन ढाकवळ(वय-35) रिक्षा चालक रा. तिलोरे ता.माणगाव यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.
सदर अपघाताबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि,अपघातातील फिर्यादी शैलेश ढाकवळ हे त्यांच्या ताब्यातील रिक्षा अज्ञात ट्रकवरील चालकाने त्याच्या ताब्यातील ट्रक रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने चालवून इंदापूर बाजूकडून माणगाव बाजूकडे जाणारी मोटार सायकला पाठीमागून ठोकर मारून अपघात करून सदर मोटारसायकल रिक्षावर आदळून या अपघातात मोटारसायकलस्वार संजय केवत रा.माणगाव व फिर्यादी रिक्षाचालक शैलेश ढाकवळ हे दोघे जखमी होऊन यांच्या वाहनाचे नुकसान झाले.या अपघाताची खबर न देता व जखमींना मदत न करता ट्रकचालक पळून गेला.त्याच्यावर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सदर अपघाताच्या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक आर.पी.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस नाईक के.डी.जाधव या करीत आहेत.