दुचाकीस्वाराच्या चुकीमुळे एसटीचा अपघात

प्रसंगावधानतेमुळे प्रवासी बचावले

| वावोशी | वार्ताहर |

साजगाव फाट्यावर रविवारी (दि.14) दुपारी 2 वाजताच्या सुमारास एका दुचाकीस्वाराच्या चुकीमुळे खोपोली-खरीवली एसटी बसचा अपघात झाला. परंतू एसटी बस चालकाच्या प्रसंगावधानतेमुळे बसमधील 37 प्रवासी सुखरूप बचावले आहेत. खोपोली-खरीवली एसटी बस (एमएच-07-सी-7188) ही पेणच्या दिशेने जात असताना साजगाव फाट्यावरील एनपी ढाब्यावर आली असता समोरून एक दुचाकीस्वार खोपोलीच्या दिशेने एका वाहनाला भरधाव वेगाने ओव्हरटेक करून जात असताना, त्या दुचाकीस्वाराचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने तो थेट बसवर येऊन आदळणार त्याच क्षणाला चालकाने प्रसंगावधानता राखत बस रस्त्याच्या बाजूला उतरवून त्या दुचाकीस्वाराचे व बसमधील 37 प्रवाशांचे प्राण वाचविले.

यावेळी बस खाली रस्त्याच्या बाजूला घेताना पलटी होता होता थोडक्यात बचावल्याने सर्व प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास टाकला. एसटी चालकाच्या प्रसंगावधानतेमुळे मात्र फार मोठा अपघात घडताना राहिला. दुचाकीस्वाराची चुकी असल्याने दुचाकीस्वाराने आपली (एमएच-46-सीजी-7337) होंडा क्टिवा कंपनीची स्कूटी रस्त्यावर सोडूनच फरार झाला. या अपघाताची वार्ता समजताच त्या ठिकाणी सनी पाटील, मयूर पाटील, रमेश पाटील यांनी प्रवाशांना बाहेर काढले व त्यांना पिण्याच्या पाण्याची सोय करून दिली.

Exit mobile version