| बोर्लीपंचतन | वार्ताहर |
श्रीवर्धन तालुक्यातील श्रीवर्धन दांडगुरी बोर्ली रोडला वावेपंचन बसस्थानकाच्या पुढे शनिवारी (दि.31) रात्री दहा वाजता रस्त्यावर दोन बिबट्याचे दर्शन घडले. एक कार श्रीवर्धनहून बोर्लीपंचतनकडे प्रवास करीत असताना त्यातील बसलेल्या व्यक्तींनी बिबट्या पाहिला व मोबाईलद्वारे छायाचित्रण केले. नागरिकांनी बिबट्यापासून सावधगिरी बाळगावी म्हणून बिबट्याचे छायाचित्र सोशल मीडियाद्वारे प्रसारित करण्यात आले. अशीच घटना काही महिन्यांपूर्वी दांडगुरी हद्दीतही घडली होती, तसेच तालुक्यातही वारंवार बिबट्याचा संचार घडत असतो. पुन्हा एकदा दोन बिबटे दिसल्याने नागरिकांमध्ये घबराट उडाली आहे.
श्रीवर्धन-दांडगुरी बोर्लीपंचतन रोडला दिवसभरत खूप वर्दळ दिसून येत असते. तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे बहुतांश लोक दुचाकीने प्रवास करीत असतात. बिबट्याच्या दिसण्याने दुचाकीस्वारांमध्ये तसेच दांडगुरी पंचक्रोशितील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. असाच बिबट्याचा संचार वाढत राहिला तर पाळीव प्राणी तसेच नागरिक यांच्याही जीवाला धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वेळीच संबंधित विभागाने लक्ष दिलं पाहिजे, अशी पंचक्रोशितील रहिवाशांकडून मागणी केली जात आहे.