| मुंबई | प्रतिनिधी |
मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी भ्रष्टाचारी महायुती सरकारचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीकडून रविवारी (दि. 1) हुतात्मा चौकापासून गेट वे ऑफ इंडियापर्यंत मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकरली होती. मात्र, हा मोर्चा सुरू होण्याआधी या मोर्चाला परवानगी देण्यात आली. फोर्ट येथील हुतात्मा स्मारक चौक येथे अभिवादन करून गेट वे ऑफ इंडिया येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ ‘शिवद्रोही’ सरकारला ‘जोडे मारा’ आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात शरद पवार, उद्धव ठाकरे, कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती, नाना पटोले यांच्यासह नेतेमंडळी सहभागी झाले आहेत. मालवणमध्ये नौदल दिनानिमित्त उभारलेला छत्रपती शिवरायांचा पुतळा 26 ऑगस्ट रोजी कोसळला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने महायुती सरकारविरोधात ‘जोडे मारा’ आंदोलनाची हाक दिली होती. मंगळवारी हुतात्मा स्मारकाला अभिवादन करून तिथून सर्वजण गेटवे ऑफ इंडिया येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर मविआकडून सरकारविरोधात ‘जोडे मारा’ आंदोलन केले.
सरकारच्या भ्रष्टचाराचा नमुना : पवार
मालवणमधील राजकोट किल्ल्यावर आठ महिन्यांपूर्वी उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडला. त्याविरोधात महाविकास आघाडीतर्फे रविवारी राज्यभर आंदोलन केले. मुंबईत झालेल्या आंदोलनाच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. मालवणमधील शिवाजी महाराजांचा उभारण्यात आलेला पुतळा म्हणजे महायुती सरकारचा भ्रष्टाचाराचा नमुना असल्याचा हल्ला शरद पवार यांनी केला.
महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्याची भूमिका राज्यकर्त्यांनी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वार्यामुळे शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याचे धक्कादायक विधान केले. राज्यभरात असलेले शिवाजी महाराजांचे पुतळे लोकांना प्रेरणा देत असतात. परंतु, मालवणमध्ये उभा केलेला पुतळा भ्रष्टाचाराचा नमुना आहे. तो पुतळा उभारण्यात भ्रष्टाचार झाला आहे. हा जनमानसात समज निर्माण झाला आहे. हा शिवप्रेमी लोकांचा अपमान करण्यात आला. त्यामुळे आम्ही सरकारचा निषेध करण्याची भूमिका घेतली, असे शरद पवार यांनी म्हटले.
सरकारची कमिशनखोरी : पटोले
राज्यात देशात शिवद्रोही सरकार आहे. महाराजांच्या नावाने पेशवाई सुरू आहे. कमिशनखोरी आणि भ्रष्टाचार केला. महाराजांचा अपमान करण्याचं काम सरकारने केलं. मालवणमध्ये महाराजांचा पुतळ पडला. तो फक्त महाराजांचा पुतळा नव्हता, तर महाराष्ट्राचा धर्म होता. शिवाजी महाराज आमचे दैवत आहे. महाराजांचा अवमान करणार्या सरकारच्या विरोधात आम्ही आंदोलन करत आहोत, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले.