आंबेत- कोकरे फाट्यावर विचित्र अपघात

ट्रॅव्हल्स-वेरना कारची जोरदार धडक; झाडी झुडपांची साफसफाई न केल्याने झाला अपघात
। आंबेत । गणेश म्हाप्रळकर ।
आंबेत कोकरे नाक्यावर अपघातास कारणीभूत ठरत असलेल्या वळणावर शुक्रवारी दुपारी 12 च्या सुमारास वेरना कार वाहन क्र (एमएच-12 क्यूएम-0525) मधून तिघेजण टोलच्या दिशेकडून येत होते. त्यावेळी दापोलीकडून गोरेगाव दिशेला जात असलेल्या टेम्पो ट्रॅव्हल्स क्र. (एम-02 इआर- 9644) या वाहनाला कारची जोरदार धडक लागली.

या ट्रॅव्हल्समध्ये 10 ते 11 प्रवासी होते. वळणावर असलेल्या मोठ्या वृक्ष तसेच येथे फोफावलेल्या झाडी झुडपांमुळे हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे कोकरे मार्गावर येत असलेला वाहनचालक हा विरुद्ध दिशेने या अपघातस्थळी येत असतो. असे प्रकार कित्येकदा या भागात घडले आहेत.


या ठिकाणी अनेक अपघात घडले असून सार्वजनिक बांधकाम विभागाने या मुख्य वळणावरील आणि अपघाती नाक्यावर अपघातास कारणीभूत ठरत असलेल्या बाबींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी दोन्ही वाहनांचे हजारो रुपयांचे नुकसान मात्र झाले आहे.

Exit mobile version