कर्जत-नेरळ रस्त्यावर अपघात; दोन महिला ठार

एक महिला अत्यवस्थ

। नेरळ । प्रतिनिधी ।

कर्जत जैन विहारमधून नेरळ मार्गे बदलापूर येथे निघालेल्या जैन साध्वी आणि त्यांच्या सोबत असलेल्या विहार सेविका यांना आज (दि.19) पहाटे अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात जैन साध्वी व त्यांच्या सोबत असलेल्या कर्जत शहरातील विहार सेविका महिलेचा मृत्यू झाला असून दुसऱ्या महिलादेखील मृत्यूशी झुंज देत आहेत. नवी मुंबई येथील खासगी रुग्णालयात त्‍यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र या घटनेने कर्जत शहरावर शोककळा पसरली असून वाहन चालकाच्या बेदरकपणाबद्दल संताप व्यक्त होत आहे.

जैन साध्वी मौलिक पूर्णाश्रीजी या कर्जत येथील विहारमधून पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास बदलापूरकडे जाण्यासाठी निघाल्या. कर्जत-नेरळ रस्त्याने त्यांचा प्रवास सुरू असताना पहाटे 5.45 वा. पायी चालत असताना त्यांच्या पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. अज्ञात वाहनाच्या धडकेत साध्वी मौलिक पूर्णाश्रीजी (52) आणि लता संदिप ओसवाल (49) यांचा जागीच मृत्यू झाला. तर, विहार सेविका दिवाळी संजय ओसवाल या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना तात्काळ नवी मुंबई येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत असून या अपघातामुळे कर्जत तालुक्यावर शोककळा पसरली आहे. अपघात झाल्यानंतर वाहन चालकाने आपले वाहन घेऊन पलायन केले असून सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. त्यासाठी सीसीटिव्ही कॅमेरे तपासले जात असून पहाटेच्या वेळी अंधाराचा फायदा घेत अज्ञात वाहन चालक पळून गेला. त्याचा शोध कर्जत पोलीस करीत असून सहकार्य करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Exit mobile version