रेवदंडा-चणेरा मार्गावर अपघात; तिघे गंभीर जखमी

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

रेवदंडा-चणेरा मार्गावर खारी गावाजवळ डंपर व मिनिडोअरच्या अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाले. ही घटना सोमवारी रात्री साडेनउच्या सुमारास घडली. याप्रकरणी रोहा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.


साळाव येथील सोहिल कासकर त्याच्या डंपरने डोलवी येथून जेएसडब्ल्यू कंपनीतील माल साळाव येथे नेत होता. रेवदंडा-चणेरा मार्गावर त्याने खारी गावाजवळ अंधारात डंपर उभा केला होता. सुरक्षेच्यादृष्टिने त्याने कोणतीही लाईट सुरु ठेवली नाही. अंधारात रस्त्यावरील डंपर न दिसल्यामुळे पाठीमागून येणाऱ्या मिनिडोअरची डंपरला जोरदार धडक लागली. यामध्ये आरे बुद्रुक येथील समिर शिंदे (37), उमाजी शिंदे (45), उज्वला शिंदे (42) हे तिघेजण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर पनवेल येथील लाईफलाईन रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

जेएसडब्ल्यू कंपनीतून अनेकदा अलिबाग-रोहा मार्गावरुन अवैध व अवजड वाहतूक केली जाते. त्यामुळे अनेकदा या मार्गावर अपघाताच्या घटना घडतात. या घटनेमुळे पुन्हा एकदा या मार्गावर वाहन चालविणाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Exit mobile version