| पनवेल | प्रतिनिधी |
जुना मुंबई-पुणे महामार्गावर बारवाईजवळ गुरूवारी (दि.21) एक भयानक अपघात घडला. या अपघातात 4-5 वाहने एकमेकांवर आदळून थेट रस्त्याच्या कडेला फेकली गेली. मिळालेल्या माहितीनुसार, जुना मुंबई-पुणे महामार्गावरून जात असताना बारवाईजवळील एका कठीण वळणावर ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि समोरून जात असलेल्या गाड्यांना जोरदार धडक दिली. यात एक रिक्षा, मारुती इको, हुंदाई आणि स्कोडा कार यांचा समावेश असून सर्व वाहनांचे प्रचंड नुकसान झाले. या दुर्घटनेत सहा जण जखमी झाले असून स्थानिक नागरिकांनी मदतकार्य करून जखमींना खासगी रुग्णालयात दाखल केले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून, अपघातग्रस्त वाहनांची नोंद घेण्यात आली आहे. या घटनेमुळे महामार्गावरील सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत.







