। उरण । वार्ताहर ।
चिरनेर-गव्हाण फाटा रस्त्यावर मार्गक्रमण करणाऱ्या मालवाहू ट्रेलरला सोमवारी (दि.12) दुपारी 12 च्या सुमारास अपघात झाला. या अपघातात स्कूटीवरुन पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या दोन महिला दैव बलवत्तर म्हणून सुदैवाने बचावल्या आहेत. त्यांना पनवेल येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
![](http://krushival.in/grygrars/2024/02/IMG-20240212-WA0098-e1707746388257-1024x556.jpg)
बेशिस्त अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे साई-चिरनेर-गव्हाण फाटा, विंधणे-दास्तान फाटा आणि चिरनेर-खोपटा या प्रवासी नागरिकांच्या रस्त्यावर रात्री-अपरात्री अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यात नुकताच खोपटा गावातील निलेश म्हात्रे या तरुणाला खोपटा रस्त्यावर झालेल्या अपघातात आपले प्राण गमवावे लागले असताना, विंधणे ग्रामपंचायत हद्दीतील वळणावरील रस्त्यावर सोमवारी दुपारी 12च्या सुमारास मालवाहू ट्रेलरला अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात ट्रेलरवरील कंटेनर रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्या स्कुटीवर पलटी होण्याची घटना घडली. मात्र, दैव बलवत्तर म्हणून स्कूटीवरुन पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या दोन महिला सुदैवाने बचावल्या आहेत. त्यांना दुखापत झाल्याने पनवेल येथील रुग्णालयात उपचारार्थ नेल्याची माहिती प्राप्त होत आहे. अपघातादरम्यान काळ आला होता, पण वेळ आली नव्हती, अशी प्रतिक्रिया प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे.