क्रेनची केबल तुटल्याने लोखंडी पिलर कोसळला; कामगारांचे प्राण थोडक्यात वाचले
| अलिबाग | वार्ताहर |
मानसरोवर स्थानकाबाहेर जाहिरात फलक उभारताना अपघात घडल्याची घटना शनिवारी (दि. 7) घडली आहे. सायंकाळी आठच्या सुमारास घडलेल्या या घटनेनुसार जाहिरात फलक उभरण्यासाठी क्रेनच्या सहाय्याने उचलण्यात आलेला पिलर क्रेनची केबल तुटून कोसळल्याने फलकाचे काम करणारे पाच ते सहा कामगार थोडक्यात बचावले असून, शेजारीच असलेल्या उसाच्या रसाच्या गाड्यांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. परंतु, या घटनेची दुसर्या दिवसापर्यंत पालिकेच्या आयुक्तांना खबरच नव्हती, याबाबत आश्चर्य वाटते.
जाहिरात फलक कोसळून जीवितहानी झाल्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वी पालिका हद्दीतदेखील जाहिरात फलक कोसळून एका वाहनाचे किरकोळ नुकसान झाल्याची घटना घडली आहे. घाटकोपर येथे काही महिन्यांपूर्वी फलक कोसळून घडलेल्या दुर्घटनेत नऊ जणांनी आपले प्राण गमवाल्यानंतर प्रशासनाकडून फलक उभारण्याबद्दल कठोर नियम करण्यात आले आहेत. असे असतानादेखील पनवेल पालिकेच्या माध्यमातून जाहिरात फलक उभारण्यासाठी नेमण्यात आलेल्या कंपनीकडून नियमांना बगल देऊन जागा मिळेल तिथे फलक उभारले जात आहेत. महत्त्वाचे म्हणजे, अगदी काही तासात उभारण्यात येत असलेल्या फलकावर दुसर्याच दिवशी जाहिराती झळकत असल्याने संबंधित कंपनी कोणत्या स्वरूपाचे स्ट्रक्चरल ऑडिट सादर करते, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
खारघर वसाहतीत जुलै महिन्यात फलक कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर पालिकेने फलक उभारणार्या कंपनीविरोधात कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र, असं न करता फलक सुरक्षित असल्याचा रिपोर्ट देणारे ऑडिटर दुर्घटनेला जबाबदार असल्याचा दावा करत पालिकेकडून फलक उभारणार्या कंपनीला क्लीनचिट देण्यात आली होती. याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.
जीवितहानी झाल्यावरच पालिकेला येणार जाग
पालिकेच्या स्थापनेनंतर पालिका हद्दीत तीन वेळा फलक कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, या घटनांनंतर पालिकेच्या माध्यमातून कोणतीही कारवाई संबंधित कंपनीविरोधात करण्यात आली नाही. यामुळे जीवितहानी झाल्यावरच पालिकेला जाग येणार का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
मोठी दुर्घटना टळली
ज्यावेळी ही दुर्घटना घडली, त्यावेळी अनेक रेल्वे प्रवासी लगबगीने घराकडे निघाले होते, तसेच शनिवार असल्याने अनेक हनुमान भक्त ज्या ठिकाणी फलक उभारण्यात येत होता, त्या ठिकाणी असलेल्या मंदिरात दर्शनासाठी उभे होते. क्रेनने उचलण्यात आलेला पिलर गर्दीपासून काहीशा अंतरावर कोसळल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.
पालिकेने अधिकृतरित्या नेमण्यात आलेल्या रौनत एजन्सीकडून फलक उभारण्याची परवानगी घेण्यात आली होती. त्यानुसार काम सुरू असताना हा अपघात झाला आहे. यामध्ये कोणतीही जीवित वा वित्तहानी झालेली नाही. या घटनेनंतर पुन्हा फलकाचे काम व्यवस्थितरित्या पूर्ण करण्यात आले आहे.
मंगेश चितळे,
पालिका आयुक्त