पोलीस कर्मचार्‍याला धक्का देत आरोपीचे पलायन

। पनवेल । वार्ताहर ।
पोलीस कर्मचार्‍याच्या हाताला झटका मारून व सरकारी जीपचा दरवाजा उघडून आरोपीने बेडीसह पलायन केल्याची घटना कळंबोली स्टील मार्केट येथे घडली आहे. आरोपी विरोधात कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारुती उर्फ काळू नागनाथ माने (वय 24) राहणार उस्मानाबाद असे आरोपीचे नाव आहे.

वेळापूर पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण येथे मारुती उर्फ काळू नागनाथ माने या आरोपीविरोधात पोक्सोसह बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. या आरोपीला घेऊन गुन्ह्यात वापरलेली मोटर सायकल आणि घटनास्थळ पंचनामा करण्यासाठी पोलीस सरकारी जीप क्रमांक एमएच 12 पीटी 7012 घेऊन भिवंडी येथे आले होते. भिवंडीहुन मुंब्रा-पनवेल हायवेवर भीमा कॉम्प्लेक्स समोर स्टील मार्केट, कळंबोली येथे आले असता त्यांना या ठिकाणी ट्रॅफिक लागली.

त्यामुळे सरकारी जीप तेथे थांबवली. याचा फायदा घेऊन आरोपीने पोलीस राहुल फुले याच्या हाताला झटका मारुन जीपचा दरवाजा उघडून तो स्टील मार्केट कळंबोलीच्या दिशेने पळून गेला. त्याचा पाठलाग करण्यात आला. मात्र तो सापडून आला नाही. अंधाराचा व ट्रॅफिकचा फायदा घेऊन आरोपी पळून गेला. आरोपी मारुती उर्फ काळू नागनाथ माने याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version