कुरूळ येथील गोळीबार आणि हत्या प्रकरणातील आरोपीला आजन्म कारावास

अलिबाग येथील सत्र न्यायालयाचा आदेश

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

गोळीबार आणि हत्या प्रकरणातील आरोपीला आजन्म कारावास अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. अलिबाग मधील सत्र न्यायालयाने हा आदेश मंगळवारी झालेल्या सुनावणीत दिला. अलिबाग तालुक्यातील कुरूळ येथील टेकडीवरील ही घटना होती. समीर उर्फ लालदेव चव्हाण असे आरोपीचे नाव आहे. त्याला साठ हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अलिबाग तालुक्यातील कुरुळ येथील टेकडीवर असलेल्या जंगलात जितेंद्र मगर आणि त्याचे सहकारी रात्री पार्टी करायला गेले होते. मध्यरात्री ते आपली पार्टी आटपून घराच्या दिशेने परत निघाले. टेकडीवरून उतरत होते. 31 मार्च 2019 रोजी रोजी रात्री दबा धरून बसलेले राजेंद्र मगर आणि त्याचे साथीदारांनी पिस्तुलातून गोळीबार सुरु केला. यात सागर पाटील आणि मागे बसलेला गौरव भगत हे गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान सागरचा मृत्यू झाला. या प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अलिबागचे तत्कालीन पोलीस निरीक्षक के डी कोल्हे या प्रकरणाचा तपास करत होते. वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून सख्या भावाने आपल्या मित्रांच्या मदतीने हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलीसांनी तपास करून आरोपींविरोधात दोषारोप पत्र अलिबाग येथील सत्रा न्यायालयात दाखल केले होते. या प्रकरणाची सुनावणी अलिबाग येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश -3 संतोष भगत यांच्या न्यायालयात झाली. सरकारी अभियोक्ता म्हणून जिल्हा सरकारी वकील संतोष पवार यांनी या प्रकरणात काम पाहीले. यात फिर्यादी, गोळीबारात जखमी झालेला साक्षीदार, तपासिक अमंलदार यांची साक्ष महत्त्वाच्या ठरली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने सरकारी अभियोक्ता पवार यांचा युक्तिवाद ग्राह्य धरला. आणि आरोपी समीर उर्फ लालदेव चव्हाण यास आजन्म कारावास आणि 60 हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली.

Exit mobile version