पोलिसांना मारहाण प्रकरणी आरोपींना पोलीस कोठडी

। नागोठणे । वार्ताहर ।

झोतीरपाडा परिसरात पोलिस पथकावर हल्ला करणार्‍या शिहू येथील चार जणांवर नागोठणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यातील आरोपींना पेण न्यायालयाने मंगळवारपर्यंत (दि.4) पोलीस कोठडी ठोठावली आहे.

झोतीरपाडा हद्दीत रिलायन्स टाऊनशीप येथे नागोठणे पोलिस ठाण्यात कर्तव्यावर असलेले पोलिस नाईक नीतीन गायकवाड हे अक्षय सुनिल बुरसे व काशीनाथ वामन सुतार यांच्यासह लोकसेवक म्हणून नेमून दिलेल्या शासकीय पोलीस कर्तव्य सार्वजनिक कार्य पार पाडत असताना राहुल प्रेमराज पिंगळे, प्रणित प्रेमराज पिंगळे, अक्षय पिंगळे तिघेही रा. शिहू, ता. पेण तसेच एक अज्ञात व्यक्ती (नाव माहित नाही) यांनी नितीन गायकवाड यांची गळपट्टी पकडून गळा दाबून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

याचवेळी त्यांना सोडविण्यासाठी आलेल्या अक्षय बुरसे यालाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तर काशीनाथ सुतार यांना आरोपी प्रणित पिंगळे याने त्याच्या डाव्या खांद्याला चावून गंभीर दुखापती केल्या. त्यानंतर आरोपी हे त्यांच्याकडील लाल रंगाच्या स्वीफ्ट कारने पळून जाताना गाडीचा वेग वाढवून त्यांच्या अंगावर गाडी घालून जिवे ठार मारण्याच्या प्रयत्न केला. त्याचवेळी गायकवाड यांच्यासह दोघांनी स्वतःचा जीव वाचविण्याकरिता बाजुला उड्या मारल्या. त्यानंतर चारही आरोपी हे अतिवेगाने गाडी गेटच्या बाहेर घेऊन पळून गेले.

या घटनेची माहिती मिळताच रोहा उपविभागीय पोलिस कार्यालयाचा अतिरिक्त कार्यभार असलेले महाडचे सहा.पोलीस अधिक्षक निलेश तांबे यांनी नागोठणे पोलीस ठाण्यात भेट देऊन माहिती घेतली. पोलीस निरीक्षक राजन जगताप हे स्वतः अधिक तपास करीत आहेत.

Exit mobile version