। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
हरी ओम मंगल कार्यालय (लता टॉकीज) गाडीतळ येथील एका वयोवृध्द महिलेला दुखापत करुन तिच्या हातामधील दोन सोन्याच्या बांगड्या व गळ्यामधील सोन्याची चैन जबरदस्तीने खेचून जबरी चोरी केल्याची घटना शनीवारी (दि.28) घडली होती. याबाबत रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधीत आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या तपास पथकाने गोपनीय बातमीदाराद्वारे मिळालेल्या माहीतीवरुन हा गुन्हा शेखर रमेश तळवडेकर याने त्याची पत्नी आश्लेषा शेखर तळवडेकर हीच्या मदतीने केलेला असल्याचे निष्पन्न झाले होते. गोपनीय माहीतीच्या आधारे संशयीत आरोपी शेखर तळवडेकर (48) व आश्लेषा तळवडेकर (47) यांना 24 तासांच्या आत ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून गुन्ह्यात जबरी चोरी केलेले एकूण 1 लाख् 64 हजार रुपये किमंतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. गुन्हयाचा पुढील तपास रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यामार्फत सुरु आहे.