। नवीन पनवेल । प्रतिनिधी ।
पत्नीची हत्या करून 33 वर्षे फरार असलेल्या आरोपीला पनवेल शहर पोलिसांनी अटक केली. बाबू गुडगीराम काळे असे आरोपीचे नाव आहे.
28 जानेवारी 1991 रोजी आरोपी बाबू काळे यांनी पत्नीला किरकोळ भांडणावरून तिच्या अंगावर रॉकेल ओतून जाळण्याचा प्रयत्न केला. तिला सायन हॉस्पिटल येथे दाखल केले असता महिलेने दिलेल्या तक्रारीवरून पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आरोपी तेथून फरार होऊन स्वतःचे अस्तित्व लपवत असल्याने त्याच्या विरोधात दोषारोपपत्र न्यायालयामध्ये सादर करण्यात आले. गेली 33 वर्षे त्याने पोलिसांच्या हातावर तुरी दिल्या.
प्रथम वर्ग न्यायालयाचे अटंक वॉरंट प्राप्त झाल्याने पोलिसांनी आरोपीची माहिती प्राप्त केली. यावेळी आरोपी हा मुलुंड येथे असल्याबाबत माहिती प्राप्त झाली. पोलीस पथकाच्या सहाय्याने मुलुंड येथे तपास केला असता आरोपी हा सेतू, जिल्हा परभणी येथे असल्याबाबत प्राथमिक माहिती मिळाली. त्यानुसार वपोनी नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी प्रकाश पवार व पोलिसांचे पथक पाठवून तपास केला असता आरोपीचा मोबाईल नंबर सापडून आला. मोबाईल क्रमांकाच्या तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी बाबू गुडगिराम काळे (70) याला शिताफिने ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन जानेवारीपर्यंत कोठडी सुनावली.